Breaking newsHead linesPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

अजित पवारांकडून मोदी-शाहांची दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप!

पुणे (सोनिया नागरे) – वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांत बंदद्वार पाऊणतास चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांनी आंबेडकर यांना गाठले असता, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. ‘देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची दिशाभूल करणारे एकमेव नेते अजित पवार आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, की ‘आजच्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या केंद्रस्थानी अजित पवार आहेत.  देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची दिशाभूल करणारे एकमेव नेते अजित पवार आहेत.  त्यामुळे सर्वांचे लक्ष अजित पवारांकडे लागलेले आहे.  अजित पवार अजून बरेच दिवस राजकारणाच्या मध्यस्थानी राहतील, अशी परिस्थिती आहे. देशात अनेक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना घाबरतात. पण, अजित पवारांनी एकदा नाहीतर दोनदा नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना ‘उल्लू’ बनवलं आहे.  अजित पवारांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेत, आपल्यावरील सर्व केसेस बंद केल्या. आता भाजपाला कुठे अजित पवार आपल्याबरोबर येणार असं वाटलं होतं. अमित शाहांनी अजित पवारांना गृहीत धरून लोकसभेच्या ४८ जागा लढण्याची तयारी दर्शवली होती. पण, आताही मोदी आणि शाहांना पुन्हा ‘उल्लू’ बनवलं आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

छत्रपती संभाजीराजे यांच्या भेटीत काय चर्चा झाली? यावर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, की ‘छत्रपती संभाजीराजे व माझी राजकीय विषयावर भेट झाली. मराठा आरक्षणाचा निकाल लावायचा असेल तर सत्ता हवी’. ‘आतापर्यत मराठा आरक्षणाबाबत फक्त राजकारण झालं. संघटन तयार केलं आहे, त्यावर चर्चा झाली. आम्ही एकत्रित यायचं की नाही यावर ते सवंगड्यांशी चर्चा करून ठरवतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. बारसू प्रकल्पावर भाष्य करता ते म्हणाले, की ‘ब्रिटिश वृत्ती अजून गेली नाही, ती अर्धवट आहे. राज्य आणि लोक याच्यासाठी काय हवं अजून हे सरकारला कळलच नाही. बारसू प्रकल्पाला आमचा विरोध आहे’. ‘सरकारने दुसरी जागा शोधावी. कोकणातच का? तर आंतरराष्ट्रीय राजकारणचे स्थान आहे, ते संपावायच आहे. राणे-ठाकरे भांडण म्हणजे नवरा बायकोच भांडण आहे, राज्याच्या हिताचे काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.


दरम्यान, कालपासून प्रकाश आंबेडकर हे अजित पवारांना टार्गेट करत असल्याचे दिसून येत आहे. कालही बदलापूर येथील सभेत आंबेडकर म्हणाले होते, की स्वतःवरील केसेस काढून घेण्यासाठी अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला. त्यांनी आपल्या केसेस विड्रॉल केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा एनसीपीमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेस आधी शाहू, फुले, आंबेडकरवादी म्हणवत होते आणि आता भाजपसोबत बसत असतील तर त्यांनी इतकी वर्ष फसवलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सरड्यासारखा रंग बदलत असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली होती.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!