Breaking newsHead linesMaharashtraVidharbha

जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्यामराव गाभणे कालवश

मेहकर, जि. बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) – जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा तब्बल ११ वर्षे सभापतीपद भूषवणारे ज्येष्ठ नेते श्यामराव परसरामजी गाभणे यांचे आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ९५ वर्षांचे होते. जिल्ह्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिलकुमार गाभणे यांचे ते वडिल होतं. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीसह मेहकर तालुक्यात शोकसंवेदना प्रगट होत आहेत. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

विवेकानंद आश्रमाचे संस्थापक तथा थोर कर्मयोगी संत पू. शुकदास महाराजश्री यांच्याशी त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. दरवर्षी विवेकानंद आश्रमाच्यावतीने साजरा होणार्‍या विवेकानंद जन्मोत्सवाच्या संयोजन कार्यात ते महत्वाची भूमिका बजावत असतं. विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यातही त्यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. जिल्ह्यातील दुग्धोत्पादन वाढीसाठी त्यांनी आपल्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती काळात महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. उत्कृष्ठ पशुपालकाचा सन्मान हा त्यांचाच महत्वपूर्ण निर्णय होता. देळगावमाळी येथे त्यांनी महात्मा फुले शिक्षण संस्थेची स्थापना करत, खेड्यापाड्यातील बहुजनांच्या गोरगरीब मुलांना शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली होती. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शेती, सहकार, शिक्षण, अध्यात्म अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शोकसंवेदना प्रगट केल्या जात आहेत. तसेच, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत होती. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचि संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनीही आपल्या शोकसंवेदना व्यक्त करत, त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

विवेकानंद आश्रमाने महत्वपूर्ण
हितचिंतक गमावला – पू. आर. बी. मालपाणी
श्यामरावजी गाभणे व विवेकानंद आश्रम परिवाराचे अतुट असे नाते होते. आश्रमाच्या सेवाकार्यात त्यांनी नेहमीच महत्वपूर्ण योगदान दिले. आश्रमाच्या स्थापनेपासून ते निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराजश्रींच्या सेवाकार्यात सोबत होते. विवेकानंद जन्मोत्सवाच्या नियोजन व संयोजनात त्यांनी नेहमीच महत्वपूर्ण जबाबदारी उचलली व हा जन्मोत्सव लोकाभिमुख करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निधनाने विवेकानंद आश्रमाची मोठी हानी झाली आहे. आम्ही महत्वपूर्ण हितचिंतक गमावला आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास सदगती प्राप्त होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
– पू. आर. बी. मालपाणी, अध्यक्ष, विवेकानंद आश्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!