Breaking newsBuldanaHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

आम्ही ४२ आमदार ‘त्यांचे’ बाप आहोत का?

– संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले!
– राऊत यांनी आमचे बाप काढले, आम्हीही त्यांचे बाप काढू शकतो!
– शिवसेनाप्रमुखांचा फोटो व धनुष्यबाण वापरणारच!

बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) – शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलडाणा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेत, तसेच फेसबुक लाईव्ह येत, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, संजय राऊत यांनी आमचे बाप काढले, खालच्या पातळीवर आमच्यावर टीका केली. आम्ही ४२ आमदारांनी त्यांना मतदान केले. त्यामुळे आता त्यांनी सांगावे, हे ४२ आमदार त्यांचे बाप आहेत का? राऊत यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, मगच आमच्यावर बोलावे, अशा शब्दांत आ. गायकवाड यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला ठणकावले.
शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आल्यानंतर आमदार संजय गायकवाड हे पहिल्यांदाच मतदारसंघात आले होते. आपल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी फेसबुक लाईव्ह व पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे देशातील ३२ महापुरुषांपैकी एक आहेत. राष्ट्रपुरुष हे कुणाच्या बापाचे नसतात; ते देशाचे असतात. त्यामुळे आमच्या बॅनरवर आणि प्रत्येक कार्यक्रमात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो राहणारच आहेत, असेही आ. गायकवाड म्हणाले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक आहे. ते राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते. त्यामुळेच शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडाची भूमिका घेतली. सर्वच बंडखोर आमदारांचे विचार आणि मत एकच आहे; महाविकास आघाडीतून बाहेर पडा. असे असताना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर का पडले नाहीत? ते पक्षप्रमुखच ठीक होते, असेही आ. संजय गायकवाड यांनी सांगितले.

ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले,  त्यावेळी आम्हालाही आनंद होता, पण कालांतराने राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला निधी मिळू दिला नाही, आमच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. त्यामुळे फुटलेले सर्वच आमदार व्यथित होत होते आणि त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला, असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.

शिवसेनेचं धनुष्यबाण लवकरच आम्हाला मिळणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत सगळं चित्र स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे हे देवमाणूस असून आजही सर्व आमदार त्यांचा आदर करतात. पण त्यांच्या भोवताली राष्ट्रवादी आणि काँग्रेस असल्यानं त्यांना सुचू देत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता. 

संजय गायकवाड, आमदार बुलडाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!