MEHAKARPolitical NewsPolitics

मेहकर बाजार समिती निवडणूक; बंजारा समाजासह अल्पसंख्यांकांना डावलल्याने संतापाची लाट!

– बाकीच्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का?

मेहकर (अनिल मंजुळकर) – मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगलीच गाजत आहे. एकूण १८ जागांसाठी ४७ उमेदवार मैदानात आहेत. असे असले तरी मुख्य लढत ही शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्येच आहे. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक विशेष चर्चेत आहे. यावेळेस बंजारा समाजासह अल्पसंख्यांकांना या निवडणुकीत डावलल्याने शिंदे गटाला फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

युती असूनही शिंदे गटाने भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात केला, असा आरोप भाजप तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शिव पाटील ठाकरे यांनी केला आहे. युतीत जागा न मिळू दिल्यामुळे भाजपचे दोन उमेदवार हे अडते-व्यापारी मतदारसंघात स्वबळावर लढत आहेत. आमचा विश्वासघात केल्याने शिंदे गटाचेच नुकसान होणार आहे, असे मत अ‍ॅड. शिव पाटील ठाकरे यांनी व्यक्त केले. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) नेते प्रा. आशीष रहाटे यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर तोंडसुख घेतले आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांवर दबाव टाकून त्यांचा व सतीश ताजने यांचा नामांकन अर्ज बाद केला, असे त्यांनी म्हटले आहे. खासदार प्रतापराव जाधव यांचे जवळचे नातेवाईक माजी सभापती अ‍ॅड. सुरेशराव वानखेडे हे महाविकास आघाडीकडून लढत आहेत. त्यामुळे नातेवाईकच जर शिंदे गटापासून दूर गेले, तर काय समजायचे ते समजून घ्यावे, अशी चर्चा गावागावांत आहे. आमदार-खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहायला पाहिजे होते, असे मत खासगीत बोलताना मतदारराजा व्यक्त करीत आहे, अशा अनेक बाबींचा फायदा महाविकास आघाडीतील उमेदवारांना होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या ताब्यात सोसायट्या नाहीत. ग्रामपंचायतीदेखील नाहीत. तरीदेखील ते कशाच्या आणि कोणाच्या भरवशावर लढत आहेत, असा सवाल शिंदे गटाच्या मंडळींकडून केला जात आहे. जेव्हापासून खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, तेव्हापासूनच्या एकाही सभापतीवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. उघडपणे हर्रासी करीत आल्यामुळे आमच्याबाबत अधिक विश्वासार्हता आहे. यासोबतच, पारदर्शकता राहावी, म्हणून सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. अशा अनेकविध सुविधा पुरविल्या आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहेत. खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर या दोघाच्या निधीतून सगळीकडे कामे सुरू आहेत. त्यामुळे मतदार आणि जनतादेखील आमच्यासोबत आहे, असे मत शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे. पण शिंदे गटाच्या उमेदवारांना मते घेण्यासाठी दमछाक होत आहे. हे मात्र नक्की.


शिंदे गटाने भाजपसोबत विश्वासघात केला, हे उघडच आहे. पण तरीदेखील आम्ही आमचे दोन्ही उमेदवार निवडून आणू. त्यांच्या माध्यमातून अत्यंत सकारात्मक बदल बाजार समिती प्रशासनामध्ये करू. येथून पुढच्या निवडणूक ह्या स्वबळावर लढवून आम्ही भाजपची ताकद दाखवून देऊ.
अ‍ॅड. शिव पाटील ठाकरे, भाजप तालुकाध्यक्ष
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!