Pachhim MaharashtraSOLAPUR

सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाची विराट मिरवणुकीने सांगता

सोलापूर (संदीप येरवडे) – डॉल्बीच्या दणदणाटात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती सप्ताहाची सांगता सोलापुरात रविवारी भव्य दिव्य, दिमाखदार, अतिविराट आणि हायटेक अशा मिरवणुकीने करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये डॉल्बीच्या तालावर भीमसैनिकांनी ठेका धरला होता. रविवारी काढण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये प्रचंड गर्दी होती.

बोलो रे.. बोलो.. जय भीम बोलो.. ताकत से बोलो जय भीम बोलो चा गगनभेदी जय घोष… ढोल, ताशाच्या तालावर आणि डॉल्बीच्या दणदणाटात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती सप्ताहाची सांगता सोलापुरात रविवारी भव्य दिव्य, दिमाखदार , अतिविराट आणि हायटेक अशा मिरवणुकीने करण्यात आली. आंबेडकरी विचारांचा जागर करत शानदार मनोहरी मिरवणूक पाहून लक्ष लक्ष डोळ्यांचे पारणे फिटले. ऐतिहासिक देखाव्यातून डॉ. आंबेडकरांच्या क्रांतिकारी कार्याचे दर्शन घडले. मिरवणुकीच्या सर्वच मार्गावर दुतर्फा जनसागर लोटला होता. रखरखत्या उन्हातही जगभरातून आलेल्या लाखो आबालवृद्ध भीम सैनिकांचा आंनद व उत्साह ओसंडून वाहत होता.
१४ एप्रिल पासून प्रारंभ झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहाची या मिरवणुकीने सांगता करण्यात आली. तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची दिमाखदार मिरवणूक जयंती उत्सव मंडळांनी काढली. सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजा आणि उद्घाटन होऊन मिरवणुकांना प्रारंभ झाला. या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य तसेच चळवळीचा इतिहास देखाव्याच्या माध्यमातून उलगडण्यात आला. विविध जयंती उत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक
उपक्रमाच्या माध्यमातून नवा अध्याय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. जगभरातून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून सुद्धा समाज बांधव सोलापूरात मिरवणुकीला आले होते. मिरवणुकीत बहुजन समाज बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता. लाखो तरुण आणि अबालवृद्ध या मिरवणुकीत डॉल्बीच्या निनादात थिरकताना दिसून आले.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने आज महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते महापालिकेचे वाहनाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिकेचे आयुक्त शीतल तेली – उगले व दोन्ही मध्यवर्तींच्या अध्यक्ष यांच्या उपस्थित पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,नगर अभियंता लक्ष्मण चलवादी माजी गटनेते आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, माजी नगरसेवक विनोद भोसले, मध्यवर्ती उत्सव समिती अध्यक्ष शिवम सोनकांबळे, मध्यवर्ती उत्सव समिती अध्यक्ष सुहास सावंत, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, सुभानजी बनसोडे, राजू कदम, राहुल शंके, खंडू साबळे, जीवन हिप्परगीकर, रवी कदम,अंकुश मडिखांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहास सोलापूर शहरात दिनांक १४ एप्रिल पासून उत्साहात प्रारंभ झाला. या जयंती सप्ताहाची सांगता आज रविवारी भव्य अशा मिरवणुकीने झाली. या भव्य दिव्य दिमाखदार अशा मिरवणुकीस आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासूनच उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. ‘बोलो रे बोलो जय भीम बोलो’, ‘ताकत से बोलो जय भीम बोलो’, ‘हिम्मत से बोलो जय भीम बोलो’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. रखरखत्या उन्हातही उत्साहाला उधाण आले आहे.
डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली. एका पेक्षा एक सरस अश्या आकर्षक सजावटी व देखावे विविध मंडळांनी साकारले आहेत. डोळ्याचे पारणे फिटावे असे मनोहारी दृश्य या मिरवणुकांकडे पाहिल्यानंतर दिसून येते. सुमारे ५० हून अधिक मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला आहे. बहुतांश मंडळांनी डॉल्बीसह भव्य अशा मिरवणुका काढल्या आहेत. डॉल्बीवर डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्यासह विविध प्रकारची गाणी वाजविण्यात येत आहेत.


जीएम, प्रबुद्ध भारत तरुण मंडळाची लक्षवेधी मिरवणूक
जीएम, प्रबुद्ध भारत तरुण मंडळाची सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त अजित बोराडे , विजय कबाडे, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल, माजी विरोधी पक्ष नते अमोल शिंदे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, सुशील बंदपट्टे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव आदींसह पदाधिकारी व अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!