बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यात आज वादळी पावसाने सोसाट्याच्या वार्यासह पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. या पावसाने शेतीपिकांचे नुकसान तर केलेच पण शेतकर्याच्या पशुधनाचीही हानी केली. बाबुलखेड येथे वादळी वार्यासह वीज पडून दोन बैल ठार झाले आहेत. त्यामुळे शेतकरी वसंता श्रीराम हाडे (वय ५०) यांचे सुमारे ८५ हजारांचे नुकसान झाले आहे.
आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेतकरी वसंता श्रीराम हाडे यांच्या मालकीच्या गट क्रमांक १२७ शिवार जाफराबाद येथे त्यांनी स्वतः झाडाखाली बैल बांधले असता, दुपारी झालेल्या पावसामध्ये वीज पडून त्यांच्या मालकीचे दोन बैल ठार झाले. त्या ठिकाणी उपस्थित बागुलखेडच्या सरपंच संगीता आबाराव हाडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैलाची किंमत अंदाजे ८५ हजार रूपये असून, या शेतकर्याचे यामध्ये फार मोठे नुकसान झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकर्याचे झालेले आर्थिक नुकसान हे शासनाकडून देण्यात यावे, अशी शेतकरी वसंता श्रीराम हाडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सहदेव लाड यांनी केली आहे. आजच्या अवकाळी पावसाने परिसरात दाणादाण उडवली असून, शेतमालाचेही मोठे नुकसान केले आहे.
————-