ChikhaliHead linesPolitical NewsPoliticsVidharbhaWomen's World

शिवसेना शिंदे गटाच्या पाच पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल!

– अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांची चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) सोशल मीडियावर अपमानजनक पोस्ट व्हायरल करणे शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांना चांगलेच महागात पडले आहे. या संदर्भात अ‍ॅडव्होकेट शर्वरी रविकांत तुपकर यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या पाच पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अ‍ॅडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गजानन मोरे, शिवाजी देशमुख, गोपीनाथ लहाने, नारायण गरड, विलास घोलप या पाच जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात १९ एप्रिल २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी चिखली पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीत नमुद आहे की, अ‍ॅड. शर्वरी तुपकर ह्या गेल्या १९ वर्षांपासून बुलढाणा जिल्हा न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात. तर त्यांचे पती रविकांत तुपकर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये व प्रामुख्याने शेतकर्‍यांचे प्रश्न घेऊन लढत असतात. चिखली येथील व्यापारी गाडे यांच्यावतीने दिवाणी न्यायालय बुलढाणा येथे प्रकरण दाखल केल्याचे निमित्त करुन गजानन मोरे, शिवाजी देशमुख, गोपीनाथ लहाने, नारायण गरड, विलास घोलप यांनी १५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषदेत व समाज माध्यमांवर बोलतांना अश्लील भाषेत टिकाटिप्पणी केली तसेच अपमानजनक वक्तव्य केले. त्यानंतर व्हॉटसअप, फेसबूक आदी सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल करुन चुकीचे आरोप केले आहे. अश्लाघ्य व बदनामीकारक शब्दांनी त्यांनी अपमानीत करण्यासह सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे कृत्य त्यांनी केले आहे. अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी दिलेल्या या तक्रारीवरुन चिखली पोलिसांनी गजानन मोरे, शिवाजी देशमुख, गोपीनाथ लहाने, नारायण गरड, विलास घोलप यांच्याविरुद्ध भादंवि कलम २९४, ५०१, ५०९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर अपमानजनक शब्द वापरणारे या पाच जणांच्या चांगलेच अंगलट आले आहे.


त्यांच्या घरात महिला नाहीत का? – शर्वरी तुपकर

माझ्यावर आरोप करणार्‍या शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांच्या घरातदेखील आई, पत्नी, मुली अशा महिला आहेत, त्यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर अपशब्द वापरल्यास त्यांना काय वाटेल? माझाच काय, कोणत्याही महिलेचा अश्लील आणि अपशब्द वापरुन अपमान करणे, समाजमाध्यमांवर अपमानजनक पोस्ट व्हायरल करणे संयुक्तीक नाही. महिलांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, राजकारण करतांना कोणत्याही महिलेविषयी लज्जास्पद वक्तव्य करणे पूर्णपणे चुकीचे आहे, महिलांविषयी अपशब्द वापरणार्‍यांनी कायदेशीर कारवाईचा विचार करुनच बोलावे, यापुढे पुन्हा कुणी अशी घाणेरडी भाषा वापरल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी दिला आहे.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!