Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

जातीव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय स्त्री मुक्त होणार नाही!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – वर्षानुवर्षे भारत देशातील स्त्रीवर मनुस्मृतीचा प्रभाव आहे. त्यामुळे या मनुस्मृतीने स्त्रीचे सर्व अधिकार नाकारले आहेत. त्यामुळे जोपर्यंत येथील जाती व्यवस्था नष्ट होणार नाही, तोपर्यंत आपल्या देशातील स्त्री खर्‍याअर्थाने मुक्त होणार नाही, असे परखड मत प्रा. संबोधी देशपांडे यांनी मिलिंद व्याख्यानमालेत मांडले.

सम्यक विचार मंच यांच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९६ व्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मिलिंद व्याख्यानमालेचे आयोजन शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे करण्यात आले होते. त्या प्रसंगी देशपांडे यांनी आपले दुसरे पुष्प गुंफले. त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता स्त्री मुक्ती चळवळ तथागत गौतम बुद्ध ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर आपले मत मांडले. देशपांडे आपले मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाल्या, इतिहासाचा अभ्यास केल्यास १९१७ पासून युनोमध्ये स्त्री मुक्तीची चळवळ सुरू झाली. अनेक स्त्रिया आपल्या हक्क अधिकारासाठी जगभरामध्ये रस्त्यावर येऊ लागल्या. परंतु एकीकडे जगभरातील स्त्रिया आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येत असताना भारत देशात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये स्त्रियांना हक्क अधिकार दिले आहेत. सर्व संघर्ष स्वतः बाबासाहेबांनी झेलून स्त्रियांना अधिकार दिले आहेत. विशेष म्हणजे, हिंदू कोड बिल पास होण्यासाठी बाबासाहेबांना स्वतःच्या मंत्रिपदाच्या राजीनामा द्यावा लागला. परंतु आज एखादा ही मंत्री आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा स्त्रीच्या अधिकारासाठी देण्याचे धाडस करीत नाही. हे वास्तव आहे.

आजही आपल्या देशामध्ये स्त्रीवर मनुस्मृतीचा प्रभाव आहे. प्राचीन काळात स्त्रीची उन्नती झाली होती. प्राचीन काळात तथागत गौतम बुद्धांनी स्त्रियांवरील सर्व बंधने मुक्त करून स्त्रियांना त्यांच्या अधिकार दिले. त्या काळात भिकू संघ होता. पुढे क्रांती आणि प्रतिक्रांती सुरू झाली. मात्र मनुस्मृतीने स्त्रीवर बंधने घातली. समाज व्यवस्थेच्या जाचक अटीमुळे देशातील स्त्री बंधनात अडकली. बाबासाहेबांनी कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांना अधिकार दिले असले तरी आजही आपण पाहतो की स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे. स्त्रियांच्या गर्भातच मुलीला मारले जाते आहे. त्यामुळे कायद्याचे पालन होताना दिसत नाही. आजही ग्रामीण भागात विधवा महिलाचे प्रचंड हाल आहेत. मनुस्मृतीचा प्रभावामुळे तिला दुसरे लग्न करता येत नाही. या मनुस्मृतिने केलेल्या कायद्याने स्त्रियावर प्रचंड अन्याय केले आहेत. त्यामुळे स्त्रियांना आजही स्वातंत्र्य नाही. आज आपण पाहतो अन्न, वस्त्र, निवारा या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, परंतु घरातील भांड्यावर व घरावर पुरुषाचे नाव असते. त्यामुळे गौतम बुद्धानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री मुक्तीसाठी लढा उभा केला आणि स्त्रियांना शिक्षणाची दारे खोली केली. बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये कलम १५ मध्ये स्त्रियांना अधिकार दिले. विशेष म्हणजे आज भारतात ज्या स्त्रियांना भरपगारी सहा महिन्याची सुट्टी दिली जाते. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत अधिकार दिले ते केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे होय. परंतु या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे भारतातील जातीव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय येथील स्त्री मुक्त होणार नाही. त्यासाठी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. येथील पुरुष प्रधान जाती व्यवस्था स्त्रियांना मुक्त करू देत नाही. कोणत्याही एका समाजाची प्रगती जर खर्‍याअर्थाने झाली असेल तर तेथील स्त्रियांची प्रगती झाली पाहिजे, असे मत संबोधी देशपांडे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधिकारी दीपाली काळे होत्या. त्या म्हणाल्या की, बाबासाहेबांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. कोणाचा जन्म कोणासाठी झाला तर बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना गायकवाड यांनी केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!