BULDHANAHead linesVidharbha

पीकविम्यासाठी रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक; कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात ठिय्या!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – पीकविमा आणि अतिवृष्टीची मदत या प्रश्नांवर शेतकरी नेते रविकांत तुपकर कायम लढा देत आहेत. विमा कंपनीने ३१ मार्चपर्यंत सर्व शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही हजारो शेतकर्‍यांना पीकविमा मिळाला नसल्याने रविकांत तुपकरांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत, १३ एप्रिलरोजी शेतकर्‍यांसह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय गाठले, आणि ठिय्या मांडला. शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम मिळाल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतल्याने अधिकार्‍यांची तारांबळ उडाली. दरम्यान, तुपकरांनी प्रधान सचिव एकनाथराव डवले यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करुन पीकविम्याचा प्रश्न मांडला. अखेर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांनी आठ दिवसांत पीकविम्याची रक्कम शेतकर्‍यांना अदा करण्याचे लेखीपत्र तुपकरांना दिल्यानंतर या आंदोलनाची सांगता करण्यात आली.

अतिवृष्टीची मदत, पीकविमा आणि नुकसान भरपाई यासाठी रविकांत तुपकर सातत्याने लढा देत आहेत. एल्गार मोर्चा, मुंबईतील जलसमाधी आंदोलन आणि त्यानंतर बुलढाण्यात आत्मदहन आंदोलन करुन तुपकरांना तरुंगात जावे लागले. तरीही त्यांनी आपला लढा कायमच ठेवला आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलनांमुळे जिल्ह्यातील दोन लाख शेतकर्‍यांना १५९ कोटी रुपये मिळाले आहे, हे आंदोलनाचे फलीत ठरले आहे. परंतु अद्यापही ५० ते ७० हजार शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने पीकविमा अदा करावा, अशी मागणी रविकांत तुपकरांनी लावून धरली होती. संबधित कंपनीने ३१ मार्चपर्यंत शेतकर्‍यांना पीकविमा अदा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ही तारीख उलटून गेली तरी अद्यापही पीकविम्याची रक्कम न मिळाल्याने रविकांत तुपकरांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत शेतकर्‍यांना घेऊन जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयात धडक दिली. कृषी अधीक्षकांच्या कक्षात त्यांनी ठिय्या मांडत पीकविम्याची रक्कम मिळाल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका घेत अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्यामुळे कृषी कार्यालयात तणाव निर्माण झाला होता. यावेळी रविकांत तुपकर यांनी प्रधान सचिव एकनाथराव डवले यांच्याशीही भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करुन पीकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. पीकविम्यापासून वंचित असलेल्या सर्व शेतकर्‍यांना रक्कम मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका तुपकरांनी घेतल्यामुळे यंत्रणा तातडीने कामाला लागली. आठ दिवसांत शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम अदा केली जाईल, असे लेखी पत्रच कृषी अधीक्षकांनी रविकांत तुपकर यांना दिल्यानंतर त्यांच्यासह आंदोलक शेतकरी शांत झाले. तुपकरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पीकविम्यापासून वंचित असलेल्या ५० ते ७० हजार शेतकर्‍यांना आता दिलासा मिळणार आहे.

रविकांत तुपकर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता कृषी विभागाने तातडीने पीकविमा कंपनी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तुपकरांना लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. १३ एप्रिल २०२३ रोजी आपणाशी झालेल्या चर्चेप्रमाणे प्रधानमंत्री पीक योजना खरीप हंगाम सन २०२२-२३ अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखीमेच्या बाबींतर्गत अद्यापपर्यंत भरपाई वाटप न झालेल्या शेतकर्‍यांना येत्या आठवडाभरात जिल्हास्तरीय समितीची सभा आयोजित करुन पीकविमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई रक्कम तत्काळ अदा करण्याची कार्यवाही केली जाईल, असे या पत्रात नमूद आहे.


जिल्हाधिकार्‍यांचीही घेतली भेट!

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील ठिय्या आंदोलनानंतर रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांचीही भेट घेतली. पीकविमा आणि अतिवृष्टीची मदत तातडीने अदा करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. शेतीमशागतीचा हंगाम आता सुरु होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पैशांची नितांत गरज असल्याने पीकविमा आणि अतिवृष्टीची मदत मिळाल्यास शेती मशागतीची कामे करता येतील, यासाठी शेतकर्‍यांना सदरची रक्कम तत्काळ अदा करावी, अशी विनंती रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!