Breaking newsBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

‘घड्याळ’, की ‘कमळ’? रविकांत तुपकरांच्या मनात काय?

बुलढाणा/मुंबई (ब्युरो चीफ) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना यंदा कोणत्याही परिस्थितीत लोकसभेत पोहोचायचे आहे. आणि, बुलढाणा जिल्ह्यातून त्यांना तशी सुवर्णसंधीदेखील आहे. तुपकर यांनी महाविकास आघाडीत यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत विश्वासू व ज्येष्ठ नेते, माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जोरदार प्रयत्न चालवलेले आहेत. काल एकनाथ खडसे यांनी तुपकरांची भेट घेतल्यानंतर तुपकर हे राष्ट्रवादीत जातील, अशी अटकळ बांधली जात असली तरी, राष्ट्रवादीच्या प्रवेशासाठी तुपकरांना नाथाभाऊंची गरज नाही. खुद्द शरद पवार व तुपकरांचे चांगले संबंध असून, पवारांनी तशी ऑफर यापूर्वीच तुपकरांना दिलेली आहे. परंतु, अत्यंत चाणाक्ष नेते असलेले रविकांत तुपकरांनी याबाबत राष्ट्रवादीला अद्याप ‘हो’ किंवा ‘नाही’, असे काहीही कळवलेले नाही. तुपकर हे राष्ट्रवादीत आले तर सिंदखेडराजा-देऊळगावराजा, मेहकर-लोणार, चिखली, आणि बुलढाणा या घाटावरील तर मलकापूर-मोताळा, जळगाव जामोद-नांदुरा या घाटाखालील तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो. तसेच, ते भाजपात गेले तर भाजपलाही फायदा होऊ शकतो. तुपकरांनी भाजपात यावे, यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच प्रयत्नशील असून, त्यांचे व तुपकरांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. बुलढाण्याच्या जागेसाठी शिवसेनेचा शिंदे गट दावा सांगत असला तरी, ही जागा भाजपला हवी आहे. तुपकर भाजपात गेले तर कदाचित तुपकर हे बुलढाण्यातून भाजपचेही उमेदवार राहू शकतात.

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अभ्यासू, तरूण आणि लोकप्रिय असे नेते आहेत. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांशी सलोख्याचे व चांगले संबंध आहेत. शरद पवारांनाही ते आपलेच वाटतात तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नानाभाऊ पटोले यांनाही ते आपलेच वाटतात. देवेंद्र फडणवीस यांचा तर त्यांच्यावर विशेष स्नेह आहेच, पण उद्धव ठाकरे यांनाही तुपकर हे त्यांचेच वाटतात. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी रविकांत तुपकरांची भेट घेतली म्हणजे ते राष्ट्रवादीत जातील, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. खुद्द शरद पवार यांनीच तुपकरांना यापूर्वी तशी ऑफर दिली होती, आणि लोकसभेसाठी कामाला लागण्याची सूचनाही केली होती. खडसे यांच्यापेक्षा डॉ. राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी आहेत. तुपकरांना राष्ट्रवादीत आणण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांनी डॉ. शिंगणे यांच्यावर यापूर्वीच सोपावलेली आहे. तुपकरांशी डॉ. शिंगणे यांचे कौटुंबीक नाते तर आहेच, परंतु जेव्हा केव्हा तुपकर हे अडचणीत आले तेव्हा डॉ. शिंगणे हेच त्यांच्यासाठी धावून गेले. त्यामुळे तुपकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी नाथाभाऊंच्या नेतृत्वाची गरज नाही. नाथाभाऊ व तुपकरांची भेट ही औपचारिक होती, त्याला राजकीय किनार नाही.

दुसरीकडे, रविकांत तुपकर हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता अत्यंत कमी असली तरी, ‘योग्य ऑफर’ आली तर ते भाजपातही जाऊ शकतात. आणि, पुढील विधानसभा निवडणुकीत चिखलीमधून श्वेताताई महाले यांना निवडून यायचे असेल तर चिखली मतदारसंघात पाळेमुळे घट्ट असलेल्या शेतकरी संघटनेची त्यांना गरज लागणार आहे. त्या मतदारसंघात तुपकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राहुलभाऊ बोंद्रे यांना मदत केली तर श्वेताताईंची पुन्हा आमदारकीची संधी हुकणार आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष राजकीय फायदा-तोटा पाहूनच तुपकरांवर डोळा ठेवून आहेत. रविकांत तुपकर यांनी जे काही शेतकरीहिताची आंदोलने केलीत, त्यांच्या आंदोलनाचा यश देण्याचे काम भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जिल्ह्यातील शिंदे गट तुपकरांच्या विरोधात असतानाही फडणवीस यांनीच तुपकरांच्या चळवळीला जीवंत ठेवण्यासाठी त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला निर्णायक यश दिले आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरोधात बंडखोरीनंतर निर्माण झालेले जिल्ह्यातील नकारात्मक वातावरण, आणि शेतकरीप्रश्नी तुपकरांनी केलेली आक्रमक आंदोलने व त्याला आलेले यश, या दोन्ही बाजू सद्या तुपकरांसाठी जमेच्या आहेत. त्यामुळे ते बुलढाण्याचे पुढील खासदार निश्चित असले तरी लोकसभेच्या मैदानात ते ‘कमळ’ हाती घेणार की ‘घड्याळ’? हे मात्र अनिश्चित आहे. तसे, तुपकरही चाणाक्ष नेते आहेत, आतापासून पत्ते खोलून बसल्यापेक्षा ऐनवेळी ते आपले पत्ते खोलतील. तुपकरांचा नैसर्गिक पिंड पाहाता, ते भाजपपेक्षा राष्ट्रवादीला प्राधान्य देतील, याबाबत मात्र काहीही शंका वाटत नाही.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!