Head linesVidharbhaWARDHA

कारंजाचा लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी गायनेर याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक

– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोराला घडविली अद्दल!

वर्धा (प्रकाश कथले) – कारंजा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंंद्र बालाजी गायनेर (वय ५६) याला लाचेची रक्कम रंगेहात स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या वर्धा येथील पोलिसांनी अटक केली. लाचखोर राजेंद्र गायनेर याने लाचेची एक हजाराची रक्कम कारंजा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातच स्वीकारली.

याच आठवड्यात येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस पथकाने दोन उच्चपदस्थ लाचखोर अधिकार्‍यांना बेड्या ठोकल्याने नागरिकांतून पोलिसांचे अभिनंदन होत आहे. कारंजा येथील वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर याच्या लाचखोरीचे अनेक किस्से बाहेर येत होते. नागरिकांचे कॉल रिसिव्ह न करणे, उद्धट उत्तरे देणे, असा चढत्या श्रेणीच्या दुर्गुणाचा समुच्चय या अधिकार्‍याला लाचखोरीकडे घेऊन गेला. अखेर हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या. कारंजा येथे पदस्थापना असताना वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर मुख्यालयी नियमित राहात नव्हता. त्याचे नागपूर येथील सरस्वतीनगरात घर आहे. कारंजा तालुक्यातील रानवाडी गावच्या तक्रारदाराला त्याने दिलेला त्रास तसेच केलेली लाचेची केलेली मागणी त्याच्या कारकिर्दीवर कलंक लावून गेली. त्याने तक्रारदाराला तब्बल १० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर सध्या दंडाचे दोन हजार तसेच लाचेचे एक हजार असे तीन हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. ही रक्कम स्वीकारतानाच त्याला पोलिसांनी अटक केली.

वर्ध्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर याने लाच मागण्याची पडताळणी १० एप्रिलपासूनच सुरू केली होती. आज ता.१२ रोजी त्याने रोख रक्कम स्वीकारली.यातील तक्रारदाराच्या जेसीबी मशीनने कारंजा वनविभागांतर्गत जमिनीचे नुकसान केले म्हणून त्यांच्यावर वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून कार्यवाहिचा निपटारा करण्याकरीता तसेच चलनाच्या दंडाचे २ हजार रुपये तसेच स्वत:करीता १ हजार रुपये स्वीकारण्याची त्याने तड़जोडीत तयारी दाखविली. त्यानुसार त्याने तीन हजारांची रक्कम स्वीकारली. त्याच्या कारंजाच्या शासकीय निवासस्थानाची झडती घेतली असता त्याच्या घरी रोख ९१ हजारांची रक्कम मिळाली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. आरोपी वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते, यांच्या मार्गदर्शनात वर्ध्याचे पोलिस उपअधीक्षक डी.सी.खंडेराव, पोलिस निरीक्षक संदीप थडवे, सहायक फौजदार रवींद्र बावनेर, हवालदार संतोष बावणकुळे, कैलास वालदे , नीलेश महाजन, प्रितम इग़ळे, प्रशांत मानमोडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!