Breaking newsBuldanaHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची “जोरदार फिल्डिंग”; डॉ. शशिकांत खेडेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

पुरुषोत्तम सांगळे
मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आज (दि.०३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे भेट घेतली. याच हॉटेलमध्ये सद्या बंडखोर आमदारांचा मुक्काम आहे. डॉ. खेडेकर यांच्या या भेटीमागचे राजकीय गणित उलगडले नसले तरी, सिंदखेडराजा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याची मुख्यमंत्री शिंदे यांची आगामी रणनीती आहे, त्यासाठी डॉ. खेडेकर यांच्यावर ‘विशेष जबाबदारी’ सोपाविण्यात आल्याचे खात्रीशीर सूत्राचे म्हणणे आहे. डॉ. खेडेकर हे सद्या शिवसेनेत आहेत, परंतु त्यांच्या या भेटीने ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत नसल्याचे दिसून येते. डॉ. खेडेकर यांना शिंदे गटाकडून राजकीय ताकद मिळण्याची चिन्हे पाहाता, माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना या मतदारसंघात मोठा राजकीय फटका बसणार आहे.

सिंदखेडराजा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सद्याची राजकीय समिकरणे पाहाता, हा मतदारसंघ यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील, हे निश्चित आहे. त्यामुळे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची मोठीच राजकीय पंचाईत झाली आहे. ते शिवसेनेत तशी राजकीय कोंडी अनुभवतच होते. २०१४ मध्ये डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसने चिखलीच्या माजी आमदार व भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या रेखाताई पुरुषोत्तम खेडेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेने डॉ. शशिकांत खेडेकर यांना मैदानात उतरवले होते. तब्बल चारवेळा राष्ट्रवादीला बहुमत देणार्‍या या मतदारसंघात रेखाताई खेडेकर यांचे व मराठा महासंघाचे नेटवर्क जबरदस्त होते, शिवाय डॉ. शिंगणे यांची यंत्रणाही त्यांच्यासाठी झटत होती. तरीही डॉ. शशिकांत खेडेकर यांनी बाजी मारत, या मतदारसंघात पहिल्यांदाच भगवा फडकविला होता. त्यानंतर आमदारकीच्या काळात त्यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला. रस्ते, पाणी यांचे प्रश्न सोडवले, मतदारसंघातील गावोगावी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत मात्र या बहुचर्चित मतदारसंघात तिरंगी लढत झाली. शिवसेनेकडून डॉ. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. राजेंद्र शिंगणे व वंचित बहुजन आघाडीकडून सविताताई मुंडे या रिंगणात होत्या. खेडेकर व शिंगणे हे मराठा समाजाचे तर मुंडेताई या वंजारी समाजाच्या आहेत. या मतदारसंघात वंजारी समाजाचे मतदान मोठे आहे. तीनही उमेदवारांनी जोमाने प्रचार केला. विकासकामे व कार्यकर्त्यांचे जाळे ही खेडेकर यांच्यासाठी जमेची बाब होती. तर ज्येष्ठ नेते तोताराम कायंदे हे वंजारी समाजाचे नेतृत्व सोबत असणे, आणि मतदारसंघावरील पकड ही डॉ. शिंगणे यांच्यासाठी जमेची बाब होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ८१ हजार ७०१ मते (४०.५८ टक्के) तर डॉ. शशिकांत खेडेकर यांना ७२ हजार ७६३ मते (३६.१४ टक्के) मते मिळालीत. तर वंचित बहुजन आघाडीच्या सविताताई मुंढे यांनी तब्बल ३९ हजार ८७५ इतकी मते घेतली. डॉ. शशिकांत खेडेकर यांचा फक्त ८ हजार ९३८ मतांनी पराभव झाला होता.
आता महाविकास आघाडीविरुद्ध शिवसेनेचा शिंदे गट व भाजप अशी राजकीय समिकरणे राज्यात निर्माण झालेली आहेत. अडिच वर्षानंतर भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेला निवडणुकांना सामोरे जायाचे आहे. त्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी चालवली असताना, शिंदे गटही याबाबत आपली राजकीय रुपरेखा तयार करत आहे. पुढील राजकीय समिकरणे पाहाता, सिंदखेडराजा या महत्वाच्या मतदारसंघात त्यांना नेतृत्व हवे होते. राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना जोरदार टक्कर देण्यासाठी म्हणून शिंदे गट डॉ. खेडेकर यांच्याकडे पाहात असल्याचे राजकीय सूत्र सांगते. तसे झाले तर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिंगणेविरुद्ध खेडेकर ही लढत रंगण्याची जोरदार शक्यता आहे.

याच अनुषंगाने व डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत खास भेट घेतली. या भेटीने शिवसेना नेतृत्व नाराज होणार आहे, हे माहिती असतानाही खेडेकर हे शिंदे यांच्या भेटीसाठी गेले. यावेळी मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हेदेखील त्यांच्या समवेत होते. भरत गोगावले, प्रकाश सुर्वे यांचीही या भेटीप्रसंगी उपस्थिती होती. या वेळी झालेल्या चर्चेचा सविस्तर तपशील हाती आला नसला तरी, सिंदखेडराजा मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलवणारी ही भेट ठरणार आहे, हे मात्र निश्चित.

युती झाली नसती तर डॉ. खेडेकर अन् डॉ. रायमुलकर हे दोघेही भाजपात असते!
मागील विधानसभा निवडणुकीवेळी (२०१९) भाजप व शिवसेनेची युती झाली नसती तर मेहकरचे विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर व सिंदखेडराजाचे तत्कालिन आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दोघेही भाजपात आले असते आणि त्यांनी भाजपकडून उमेदवारी केली असती, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. परंतु, युती झाली आणि हे दोघेही शिवसेनेत थांबले. त्यात डॉ. रायमुलकर हे विजयी झाले तर खेडेकर हे पडले. आता डॉ. रायमुलकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. तर आज डॉ. खेडेकर यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्या दिशेने पाऊल उचलले आहे. या दोघांच्या उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेण्याच्या कृतीचा भाजपला राजकीय फायदाच होणार आहे, असेही या सूत्राचे म्हणणे आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!