Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitical NewsPolitics

भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष

– शिंदे सरकारच्या बाजूने १६४ आमदारांचे मतदान

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडल्यानंतर बंडखोर नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिले शक्तिप्रदर्शन जिंकले आहे. भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर हे तब्बल १६४ मते घेऊन विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मते पडली. विशेष बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ व काँग्रेसचे दोन आमदार मतदानाला गैरहजर राहिलेत. पारनेरचे आमदार नीलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस) व सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे (काँग्रेस) यांचाही समावेश होता. या निवडणुकीत २७५ आमदारांनीच सहभाग घेतला. राष्ट्रवादीचे सात आमदार गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, हे सर्व आमदार अजितदादा समर्थक मानले जातात.
विधानसभेचे दोन दिवशीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कार्यवाही सुरु होताच उपसभापती नरहरी झिरवळ यांनी आमदारांची शिरगणती केली. यावेळी २८७ पैकी २७५ आमदार सभागृहात हजर होते. अध्यक्षांच्या विजयासाठी १४४ मतदान आवश्यक होते. या निवडणुकीत एकूण १२ आमदारांनी सहभाग घेतला नाही. त्यात, परवानगी मिळूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासह मुक्ता टिळक (भाजप), लक्ष्मण जगताप (भाजप), प्रणिती शिंदे (काँग्रेस), दत्तामामा भरणे (राष्ट्रवादी), नीलेश लंके (राष्ट्रवादी), अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी), दिलीप मोहिते (राष्ट्रवादी), बबन शिंदे (राष्ट्रवादी), मुफ्ती इस्माईल शाह (एमआयएम), आणि रणजित कांबळे (काँग्रेस) यांनी मतदानाला दांडी मारली असल्याचे दिसून आले.

सभागृहात जोरदार घोषणाबाजी
सभागृहात भाजपच्या आमदारांनी “जय भवानी, जय शिवाजी”चे नारे लावले तसेच “जय श्रीराम”च्याही घोषणा दिल्यात. तर विरोधी पक्षाने “ईडी-ईडी”चे नारे लावले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आम्ही किती मागणी केली?, तेव्हा ती मागणी राज्यपालांनी ऐकली नाही. आता या पदासाठी निवडणूक घेतली जात आहे. असं का?, हे काही आमच्या लक्षात आले नाही, असा टोला राष्ट्रादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लावला.

आजच्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पक्षादेश (व्हीप) जारी केला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने सुनील प्रभु तर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्यावतीने भारत गोगावले यांनी व्हीप जारी केला होता. ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या १७ आमदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. तर विधीमंडळातील दोन्ही गटाच्या पक्ष दालनाला मात्र कुलूप होते.

मतदान न करणारे आमदार
१. नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)
२. अनिल देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस)
३. नीलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस)
४. दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस)
५. दत्तात्रेय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
६. बबन शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
७. अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
८. लक्ष्मण जगताप (भाजप)
९. मुक्ता टिळक (भाजप)
१०. प्रणिती शिंदे (कांग्रेस)
११. मुफ्ती इस्माइल (एमआयएम)
१२. शाह फारुक अनवर (एमआयएम)
१३. रमेश लटके (शिवसेना) (निधन)
१४. रईस शेख (सपा)
१५.अबू आजमी (सपा)
१६. राजेंद्र पाटील (अपक्ष)
१७. उपसभापती (मतदान करत नाहीत.)

शिवसेनेच्या दोन आमदारांनी दाखविला स्वाभिमान, शिवसेनेत परतले
मुख्यमंत्री यांच्या गटातील अस्वस्थता आज चव्हाट्यावर आली. त्यांच्या गटातील दोन आमदारांनी स्वाभिमान दाखवत शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात परत येणे पसंत केले. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख व कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात परत येत महाविकास आघाडीला दिलासा दिला. त्यांच्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी बाके वाजून स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!