Breaking newsHead linesMaharashtraMarathwadaWorld update

छत्रपती संभाजीनगरात रामनवमीला गालबोट; किराडपुर्‍यात हिंसाचार, पोलिसांवरही हल्ले, रात्री साडेतीन वाजेपर्यंत जमावाचा नंगानाच!

– जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार, अश्रुधुराच्या नळकांड्या डागल्या, लाठीमार
– रात्रीपासून कोम्बिंग ऑपरेशन, गृहमंत्र्यांकडून दंगलखोरांवर कठोर कारवाईचे आदेश
– लोकांच्या मनात विष पेरण्यासाठी भाजप व एमआयएम जबाबदार – अंबादास दानवेंचा आरोप

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीला गालबोट लागले आहे. काल रात्री दोन गटात तुफान राडा झाला. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर किराडपुर्‍यातील राम मंदिरात तयारी करत असलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसर्‍या गटाशी वाद झाला, आणि काही क्षणातच परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यावेळी एका गटाने पोलिसांवर दगडफेक करत गाड्या जाळल्या. दोन्ही गटाला आवरण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारदेखील करावा लागला. यावेळी समाजकंटकांनी पोलिसांची ८ ते १० वाहने जाळली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील किराडपुरा भागात घडली होती. रात्री साडेतीन वाजेपर्यंत या भागात हिंसाचाराचा नंगानाच सुरू होता. पोलिसांनी अधिक कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, आता परिसरात पूर्णपणे शांतता आहे.

शहरातील किराडपुरा परिसरात काल रात्री झालेला राडा कुणी घडवला, हे शोधून काढा. शहरातल्या लोकांच्या मनात विष पेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे. शहरात त्यांना दंगल पाहिजे, मतांसाठी हे राजकारण सुरु आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते तथा शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केला. दानवे यांनी आज सकाळी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. या दंगलीनंतर आता राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काल रात्रीच्या हिंसाचारानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. या घटनेत कोणाचा सहभाग होता हे ट्रेसिंग केले जात आहे. तसेच या प्रकरणात गुन्हेदेखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनियंत्रित झालेल्या जमावाने पोलिसांच्या ताफ्यावरही हल्ला केला होता. तसेच, पोलिसांवर दडकफेक झाली होती. जमावाने पोलिसांची काही वाहनेदेखील जाळल्याची असून, जमावाच्या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचार्‍यांसह पाच ते सहाजण जखमी झाले. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हा हिंसाचार सुरू होता. घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले.

रामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किराडपुर्‍यातील राम मंदिरातदेखील जय्यत तयारी सुरू होती. मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तरुणांचा एक गट मंदिराच्या दिशेने जात होता. येथेच त्यांचा दुसर्‍या गटाशी वाद झाला. या वादात सुरुवातीला शिवीगाळ आणि नंतर हाणामारी झाली. यानंतर दोन्ही गटातील लोकांनी आपापल्या साथीदारांना बोलवले आणि हा वाद वाढतच गेला. याविषयी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटांना आवरण्याचा प्रयत्न केला. रात्री हिंसाचारादरम्यान झालेली दगफडफेक, जाळपोळ आणि त्यानंतर झालेल्या नुकसानीप्रकरणी प्रमुख दोषींवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.  छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीदेखील आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. किराडपुर्‍यात दंगल घडवणार्‍या समाजकंटकांना थारा मिळणार नाही. यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र विरोधी पक्षाचे नेते विनाकारण यावरून राजकारण करत आहेत, असा आरोप भुमरे यांनी केलाा. संभाजीनगरमधील राड्याच्या तपासासाठी १० पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणी एका जणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहे.

घटनेला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. राज्यात अशांतता निर्माण करणं, हा शिंदे सरकारचा एकमेव हेतू आहे. आज दंगली होत आहेत. मुळात राज्यात गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न आहे. देवेंद्र फडवणीस निराश, वैफल्यग्रस्त परिस्थितीत काम करत आहेत. याची कारणं शोधावी लागतील. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी सातत्याने नाराजी दिसते. काल संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली. त्याला राज सरकार जबाबदार आहे. हे सरकारचं अपयश आहे. राज्यात असं वातावरण निर्माण व्हावं, ही सरकारची इच्छा आहे, त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करते आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!