– नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकर्यांना १०८२.०९ लाख अपेक्षित
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – शेती हा व्यवसाय पूर्वीपासूनच जोखीमयुक्त आहे. परंतु, अलिकडच्या हवामान बदलाच्या काळात ही जोखीम फारच वाढलेली आहे. शेतीचे योग्य नियोजन केले तरी वाढत्या नैसर्गिक आपत्तींनी उत्पादन हाती लागेल की नाही, याची काहीही शाश्वती मिळत नाही. १५ ते २० मार्च दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ७,११५ शेतकर्यांचे हिरवे स्वप्न करपले आहे. जिल्ह्यात ४१६८.४१ हे. क्षेत्र बाधित झाले असून, या बाधित शेतकर्यांना १०८२.०९ लाख रुपयांची रक्कम अपेक्षित असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शासन दरबारी पाठविला आहे.
खरीप असो की रब्बी शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाकडून हिरावून घेतला जात आहे शेतकर्यांवर केवळ नैसर्गिक आपत्तींचेच संकट नाही तर अपार कष्ट अन् वारेमाप पैसा खर्च करुन पिकविलेला शेतमाल बाजारात नेला तर तेथे त्याची प्रचंड लूट होते. शेवटी उत्पादन खर्च तर सोडाच शेतमाल वाहतूक खर्च देखील निघणार नाही, एवढ्या कमी दरात शेतमाल विकावा लागतो. असा तोट्याचा व्यवसाय वर्षानुवर्षे अनेक शेतकरी त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे इतर काही पर्यायी साधन नसल्यामुळे करताहेत. परंतु राजकारणी राजकारणात व्यस्त असल्याने शेतकरी नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त होत आहे. पंधरा ते वीस मार्च दरम्यान अवकाळी पाऊस,वादळी वारा आणि गारपिटीमुळे फळ पिकाखालील १५५.३६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामध्ये बाधित शेतकर्यांची संख्या १२०.१८ एवढी आहे. या शेतकर्यांना ५५९३ .९४ एवढी अपेक्षित रक्कम आवश्यक असल्याचे कृषी विभागांने स्पष्ट केले. तसेच बागायत पिकाखालील ३५८४.९४ क्षेत्र ही उध्वस्त झाले आहे. ६,२३६ अशी बाधित शेतकर्यांची संख्या आहे.
या शेतकर्यांना ९६७.९३ एवढी रक्कम अपेक्षित आहे. जिल्ह्यामध्ये ६६१ शेतकर्यांचे ४२८.११ जिरायत पिकाखालील क्षेत्र बाधित झाले. या शेतकर्यांना ५८.२२ एवढी रक्कम अपेक्षित आहे. असा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासन दरबारी पाठविला आहे. राज्यातील शासकीय निम शासकीय कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्यांना झोडपून काढले. शेतातील उभे पीक उध्वस्त झाले. या पिकांचा पंचनामा देखील होत नव्हता. जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिल्यावरून कृषी विभाग कामाला लागला. असे असले तरी आता शेतकर्यांना नुकसान भरपाई कधी मिळेल हा प्रश्नच आहे.