बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मेहकर येथील ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय १०० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयाध्ये श्रेणीवर्धीत होणार असून, याला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ मार्चरोजी मान्यता दिली आहे. यासाठी मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार ड़ॉ. संजय रायमुलकर यांनी पाठपुरावा केला त्यांचे प्रयत्नाला यश आले आहे. दरम्यान, हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधा कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला असून, ती इमारत शोभेची वास्तू ठरू लागली आहे.
मेहकर येथे ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु मेहकर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, मेहकर शहराला भरपूर खेडीही लागून आहेत. मेहकर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने सहाजिकच वर्दळ असते. येथे १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय व्हावे म्हणून या भागाचे आमदार ड़ॉ.संजय रायमुलकर यांचा खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरूच होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून, मेहकर येथील ३० खाटाच्या ग्रामीण रूग्णालयाचे १०० खाटांचे उपजिल्हारूग्णालयात श्रेणीवर्धीत करण्यास राज्याच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. यासाठी येथे पुरेशी जागा उपलब्ध असल्याने बांधकाम व पदनिर्मीतीबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल, असे सदर आदेशात नमूद आहे.