शेगावचे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कार यांची शेतातच गळफास घेऊन आत्महत्या
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच प्रयोगशील शेतकरी पुंडलिक दत्तू पारस्कार (वय ४९) यांची शेतातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. शेगाव तालुक्यातील पहुरजीरा येथे ही दुर्देवी घटना घडली. सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून शेती ही सातत्याने तोट्यात जात असून, नापिकी व बँका तसेच खासगी कर्जामुळे पुंडलिक पारस्कार हे परेशान होते. त्यामुळे नैराश्यात गेल्याने त्यांनी आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास पहुरजीरा येथील आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच गावकरी व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घाव घेतली. पारस्कार यांच्या पश्च्यात आई, पत्नी, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. काहीकाळ त्यांनी शेगाव पंचायत समितीचे उपसभापती म्हणूनही काम पाहिले होते. अत्यंत मनमिळावू स्वभाव व कष्टाळू शेतकरी म्हणूनही ते सर्वदूर परिचित होते. त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबीयास तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे.
—————–