BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

लाखनवाडा, देऊळगाव साकरशासह २८ गावांत पाण्याचा ठणठणाट!

– पाण्यासाठी गावोगावी हाहाकार, अवकाळी पाऊस, संपही ठरला आड़काठी!
– गावोगावी पाण्यासाठी भटकंती सुरू असताना खासदार, आमदारांना मात्र काहीच सोयरसुतक नाही!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जवळजवळ ४५ लाख रुपयांचे वीजबील थकल्याने लाखनवाड़ा २१ गावे व देऊळगाव साकरशा ७ गावे संयुक्त पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा गेल्या १७ मार्चपासून बंद आहे. अवकाळी पाऊस त्यातच कर्मचारी संपही वसुली व प्रशासकीय बाबीसाठी काहीशी आड़काठी ठरला तर पाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी या जवळपास २८ गावांत जोरदार हाहाकार उडालेला असून, ग्रामस्थ, महिलांची भटकंती व पायपीट सुरू आहे. या गंभीरप्रश्नी बुलढाण्याचे खासदार व या भागाचे आमदार यांना मात्र काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर फाट्यावर लाखनवाड़ा २१ गावे व देऊळगाव साकरशा ७ गावे संयुक्त पाणीपुरवठा योजनेचे युनिट आहे. या योजनेसाठी शिर्ला नेमाने ता. खामगाव येथील मन नदी प्रकल्पातून पाणी घेण्यात आले आहे. लाखनवाड़ा पाणीपुरवठा योजनेतून खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने, आंबेटाकळी, बोरीअड़गाव, कंचनपूर, लाखनवाड़ा बु., लाखनवाड़ा खु., शहापूर, जयरामगड़, बोथाकाजीसह इतर गावांना तसेच मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा, पारखेड़, नायगाव देशमुख, मांड़वा फॉ.सह इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, महावितरणचे ४५ लाख रूपये वीजबील थकल्याने सदर पाणीपुरवठा योजनेची वीज कापण्यात आली. त्यामुळे १७ मार्चपासून या योजनेचा पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात बंद असल्याने गावकर्‍यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. यातील बरेच गावात तर सदर योजनेच्या पाण्याशिवाय दुसरी उपाययोजना नसल्याने पाण्यासाठी आणखी भटकावे लागत आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी या परिसरात तुफान गारांसह पाऊस पड़ल्याने जनतेचे पाण्यासाठी खूपच हाल झाले. सध्या रब्बी पिके काढणीचे काम सुरू असल्याने मजूरवर्गाची मोठी पंचाईत होत आहे. गेले आठ दिवस कर्मचारीवर्गासह ग्रामसेवक संपावर होते. त्यामुळेही अड़चण निर्माण झाली होती. असे असले तरी ग्रामपंचायतीची आवश्यक पाणीपट्टी वसुली होत नाही व इतर बाबी यामुळे थकीत बिलाचा आकड़ा वाढता आहे, असे सांगितले जात आहे.

वीजपुरवठा व पाणीपुरवठा खंड़ीत करण्याअगोदर कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. ग्रामसेवकांचा संप त्यातच पाणीपट्टीच्या वसुलीसाठी करावी लागणारी कसरत यामुळेसुध्दा वीजबील भरण्यासाठी अड़चण जात आहे. तरीही यातून मार्ग काढू, असे देऊळगाव साकरशाचे सरपंच संदीप अल्हाट यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. महावितरणची मोठी थकबाकी व त्यातच मार्च एंड़ींग यामुळे वीज वितरण कंपनीने सहाजिकच वसुलीसाठी तगादा लावला आहे. याबाबत आपण वरिष्ठांकड़े पत्रव्यवहार केल्याचे खामगाव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता थोरात यांनी सांगितले, तर ४५ लाख वीजबील थकल्याने पाणीपुरवठा योजनेची वीज खंड़ीत केल्याचे अटाळी ता. खामगाव वीज वितरण विभागाचे राजपूत यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. याबाबत वीजवितरण कंपनी खामगावचे कार्यकारी अभियंता दिनोरे यांची दे.साकरशा सरपंच संदीप अल्हाट, ग्रा.प. सदस्य रणजीत देशमुख, बाळू वानखेडे, शे. अबरार यांनी २० मार्चरोजी प्रत्यक्ष भेट घेवून सध्याच्या परिस्थिती बाबत अवगत केले.


गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद, त्यातच या परिसरात झालेला गारपीटसह जोरदार अवकाळी पाऊस, भरीसभर म्हणून कर्मचार्‍यांचा झालेला संप यामुळेसुद्धा पाण्यासाठीच्या गैरसोयीत भरच पड़ल्याचे बोलले जात आहे. एकीकड़े वीजवितरणचा वीज बिलासाठी तगादा, त्यामुळे कापलेली वीज तर दुसरीकडे पाण्यासाठी सुरू असलेली पायपीट यामध्ये या भागातील खासदार, आमदार या लोकप्रतिनिधींही लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ, महिलांनी केली आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!