बुलडाणा (राजेंद्र काळे) ‘विवाह म्हणजे योग नावाच्या शिंपल्यात स्वाती नक्षत्राचं येणं, विवाह म्हणजे विणेवर झंकारणारं सुमधूर गाणं’ असा विवाहाचा ‘राष्ट्रीय महोत्सव’ बुलडाणा अर्बनच्या तोरणदारी सहकार विद्या मंदीराच्या सांस्कृतिक भवनात येत्या ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. दिपाली तथा आशिष या मुकबधीर दाम्पत्याच्या विवाह सोहळ्याचे हे आयोजन, करण्यात आले असून, कन्यादान जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती व सौ.राजेश्वरी रामामुर्ती हे दाम्पत्य करणार असून मुलीच्या पाठीमागे जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया मामा म्हणून उभे राहणार आहेत.
स्व.अंबादासपंत वैद्य दिव्यांग बालगृह वझ्झर फाटा ता. अचलपूर जिल्हा अमरावती संचालक डॉ.शंकरबाबा पापळकर यांची मुकबधीर असलेली मानसकन्या चि.सौ.कां.दिपाली हिचा विवाह बुलडाणा येथील बिहारीलाल जांगीड जयपूर यांचे मुकबधीर चिरंजीव आशिष यांच्याशी मंगळवार ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वा. सहकार विद्या मंदीराच्या सांस्कृतिक भवन येथे भव्य-दिव्य पध्दतीने सोत्साह संपन्न होणार आहे.
राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांचे २५ वर्षापासूनचे स्नेही असणारे डॉ.शंकरबाबा पापळकर यांची दिपाली मानस-कन्या असून, ते ‘पदमश्री’ प्रभाकराव वैद्य यांचे वडील स्व. अंबादास पंत वैद्य यांच्या नावाने दिव्यांग बालगृह चालवतात. त्यांनी आतापर्यंत २४ दिव्यांग मुलींचे लग्न लावून पुनर्वसन केले असून, दिपाली ही त्यांची २५वी मानसकन्या आहे. हा विवाह ‘राष्ट्रीय महोत्सव’ म्हणून साजरा करण्याची जबाबदारी शंकरबाबांनी भाईजींवर टाकली आहे. या विवाह सोहळ्याचे विनीत भाईजींसह डॉ.सुकेश झंवर व सौ.कोमल झंवर असून मान्यवरांच्या विनंतीस मान देवून या लग्न सोहळ्याला उपस्थित राहत वधु-वरांना आशिर्वाद देवून या राष्ट्रीय अशा महोत्सवास उपकृत करण्याचे आवाहन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावतीचे अध्यक्ष पदमश्री प्रभाकर वैद्य व डॉ.शंकरबाबा पापळकर यांनी केले असून सोहळ्याचे संयोजक बुलडाणा अर्बन कर्मचारी वृंद असणार आहे.