लोणार (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मेटाकुटीस आणणाऱ्या सरकार विरोधात रोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्न घेऊन आणि शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी युवक काँग्रेस 21 मार्च रोजी मुंबईत “विधानसभा घेराव महाराष्ट्र बचाव” आंदोलन करणार आहे. या आंदोलनात पदाधिकारी व युवकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांनी केले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासंदर्भात ठोस आश्वासन न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. शिवाय राज्यातील अधिकारी – कर्मचारी यांच्या हक्काची जूनी पेन्शन योजना बंद करण्याची भूमिका घेणाऱ्या तसेच राज्यातील गरीब होतकरू सुशिक्षित तरुणांना बेरोजगारी पासून रोखण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही.राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात लाखो रोजगार घेऊन येणाऱ्या फॉक्स कॉन कंपनी सारखे मोठे प्रकल्प गुजरातकडे वळविल्या जात आहेत.
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रश्न, राज्यातील कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेंशन योजनेचा प्रश्न, वाढत्या मंहगाई चा प्रश्न, या सारखे असंख्य प्रश्न घेऊन प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेला घेराव घालण्यासाठी 21 मार्च रोजी मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्ते व युवकांनी हजारोंच्या संखेने उपस्थित राहून युवक कॉंग्रेस च्या “विधानसभा घेराव महाराष्ट्र बचाव” या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांनी केले आहे.