BULDHANAMEHAKARVidharbha

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; तीनवर्षीय चिमुरडीचा मृत्यू

– वेळेवर मदत न मिळाल्याने गेला चिमुकलीचा जीव, क्यूआरटी टीम करते काय?

मेहकर (अनिल मंजूळकर) – समृद्धी महामार्ग हा राज्यासाठी समृद्धी घेऊन येणारा ठरणार असे बोलल्या जात होते. मात्र या महामार्गवरून वाहतूक सुरु झाली आणि अपघाताची मालिकाच सुरु झाली. १२ मार्चचा अपघात अजून ताजा असतांनाच मेहकर तालुक्यातून जाणार्‍या समृद्धी महामार्गावर १७ मार्चच्या रात्री १ वाजेदरम्यान इनोव्हा गाडीचा अपघात झाला. ज्यात ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले व एक ट्रक पलटी झाल्याची घटना घडली.

डोणगावपासून जवळच समृद्धी महामार्गावर शिर्डीकडून नागपूरकडे जाताना गोहगाव ते बेलगाव शेतशिवाराच्या मधात १७ मार्चच्या रात्री १ वाजता दरम्यान इनोव्हा एमएच ०१ बीवाय ४२२१ या वाहनाचा अपघात घडला. या अपघातात इनोव्हा वाहन पलटी झाले. ज्यात सोलापूरवरून घरी लग्नाचे सामान घेऊन भंडारा येथे जाणार्‍या परिवाराच्या कुलसुम सिद्धीकी (वय ३ वर्षे) ही चिमुकली ठार झाली तर, सद्दाम सिद्धीकी वय ३२ वर्ष, गुलाम सिद्धीकी वय २३ वर्ष, अकलिम सिद्धीकी वय ९ वर्ष, सादिक सिद्धीकी वय २८ वर्ष सर्व राहणार म्हाडा कॉलोनी, भंडारा हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. अशात रात्री दीड वाजेपासून समृद्धी महामार्गावर मदतीसाठी हा पारिवार जाणार्‍या वाहनाना हात देत होते, मात्र कोणीही त्यांच्या मदतीसाठी आले नाही. अशात समृद्धी महामार्गावरील गस्ती वाहन रात्री अडीच वाजेदरम्यान आले आणि जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा ३ वर्षीय चिमुकली कुलसूम सिद्दीकी हिची प्राण ज्योत माळवली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर क्यूआरव्ही टीम, डोणगाव पोलीस स्टेशनंचे ठाणेदार नीलेश अपसुंदे व इतर कर्मचारी अपघातस्थळी पोचले होते तर अपघातात जखमी लोकांना जालना येथे उपचारासाठी हलवण्यात आले.

१७ मार्चच्या रात्री झालेल्या दुसर्‍या अपघातात झारखंडवरून नाशिककडे जाणारा मालवाहू ट्रक जेके ०१ एएच ८७७७ हा गोहगाव ते शेलगाव शेत शिवारादरम्यान पलटी झाला. सुदैवाने यात चालक आणि वाहक कोणीही जखमी झाले नाही. समृद्धी महामार्गावर होणार्‍या अपघाताचे रस्ता झाल्यापासून मालिकाच सुरु आहे. १२ मार्च रोजी सहा लोकांचा बळी गेला. ही घटना ताजी असतांनाच हा अपघात घडला ज्यात चिमुकलीचा बळी गेला.


या आधी देखील समृद्धीवर अनेक भीषण अपघात झाले असून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या कारणाने झालेले अपघात आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सक्रिय झाला आहे. तर अपघात होऊच नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!