बुलढाणा जिल्ह्यातील ९६ गावांना अवकाळीचा फटका; अडीच हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त!
बुलढाणा (गणेश निकम) – गहू, हरभरा, मका व कांदा आदी पिके हातासी आली असताना ऐनवेळी आलेल्या अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण उडाली आहे. जिल्ह्यातील ९६ गावात दोन हजार ३७१ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.
जिल्ह्यात दिनांक १८ मार्च रोजी ठिकठिकाणी गारपीट झाल्याने फळपिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे रात्री वीज पडून एका गाईचा मृत्यू झाला. मार्च महिना म्हणजे कडक उन्हाळा. होळी झाली म्हणजे घामाच्या धारा सुरू होतात. यंदा मात्र ऋतुचक्र बदलले असून, उन्हाळ्यातच कुलकुल ठंडा ठंडा माहोल आहे. दिनांक १७, १८ मार्च रोजी जिल्ह्यात ठीकठिकाणी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर, खामगाव व मलकापूर या पाच तालुक्यात विशेषता: अवकाळी बरसला. या तालुक्यात गारपीट झाल्याने फळपिकांचे नुकसान झाले. वादळी पावसाने ९६ गावे बाधित झाल्याचा प्रशासनाचा सर्व्हे आहे.
यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील ११ गावे, संग्रामपूर २१, मेहकर ३, खामगाव २५ तर मलकापूर तालुक्यात सर्वाधिक ३१ गावात वादळी वार्यासह पाऊस बरसला. उर्वरित तालुक्यातदेखील मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. संग्रामपूर तालुक्यात १८ मार्च रोजी वादळी वार्यासह पावसाचे आगमन झाले. येथील वरवंट बकाल येथील शेतकरी प्रशांत विष्णू रौंदळे यांच्या गट नंबर ५४ मध्ये शेतातील गोठ्यावर वीज पडून गायचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यात विशेषतः घाटाखालील भागात गारपीट मोठ्या प्रमाणात झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात एकूण २३७१ पेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी दिली. सध्या गहू, हरभरा काढणे सुरू आहे. काही भागात गहू काढणी झाली आहे. तर काही ठिकाणी गहू काढण्यासाठी अजून अवकाश आहे. हीच अवस्था हरभरा व इतर पिकांचीदेखील आहे. आलेल्या पावसाने हाताशी आलेले गहू, हरभरा पिकाची माती झाली. याशिवाय कांदा, डाळिंब, संत्रा, आंबा, ज्वारी, भाजीपाला हे पिके देखील उद्ध्वस्त झाले आहेत.
तात्काळ मदत द्यावी – शेतकरी नेते रविकांत तुपकर
पीक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. प्रशासनाचा सर्व प्राथमिक सर्वे आहे. प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी अधिक नुकसानीची शक्यता आहे. नुकसानीचा तात्काळ सर्वे करून शेतकर्यांना मदतीचा हात शासनाने दिला पाहिजे.
– रविकांत तुपकर, शेतकरी नेते
———————