– चिखली पोलिसांसह राज्य सरकारचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निषेध
– बुलढाणा येथे महाविकास आघाडीची निषेध सभा, प्रमुख नेत्यांची जोरदार टीका
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर चिखली पोलिसांनी राजकीय दबावातून चोरी, रोडरॉबरी आणि दरोड्यासारखे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे हास्यास्पद असून, धांदांत खोटे आहेत. हे गुन्हे तातडीने खारीज करण्यात यावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांना निवेदन सादर करून करण्यात आली. यावेळी एसपींना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यानंतर बुलढाणा येथे निषेध सभा घेऊन खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, इतक्या गंभीर स्वरुपाचे अजामीनपात्र गुन्हे चिखली पोलिसांनी दाखल केले असले तरी, न्यायालयाने मात्र एकाच दिवसांत जामीन मंजूर करून, पोलिसांना अप्रत्यक्षरित्या चपराक दिली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांच्या पेन्शनसंदर्भात ‘हरामाची कमाई’ असे वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर या वक्तव्याचा निषेध होत असून, रोष व्यक्त केल्या जात आहे. याबाबत शिक्षक आमदार धीरज लिंगाडे यांनी यासंदर्भात आमदार गायकवाड यांचे चुकीचे वक्तव्य असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. येथील गांधी भावनात आज, १९ मार्च रोजी आयोजित महाविकास आघाडीच्या निषेध सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांच्यावर पोलीस प्रशासनाने दाखल केलेले गुन्हे खारीज करण्यासंदर्भात ही सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आमदार राजेश एकडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, शेतकरी नेते रविकांत तुपकर, माजी आमदार दिलीप सानंदा, माजी आमदार रेखाताई खेडेकर, शिवसेना (ठाकरे) संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार धीरज लिंगाडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर पेन्शनसंदर्भात आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की सरकारी कर्मचारी ५८ वर्षापर्यंत काम करतात. म्हातारपणी पेन्शन मिळाली पाहिजे. राज्यघटनेनुसार त्यांना पेन्शन मिळणे त्यांचा हक्क आहे. शासन त्यांच्यावर कुठली मेहरबानी करीत नाही. कर्मचार्यांचा पेन्शन मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, चिखली येथील मारहाण प्रकरणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे व समर्थकांवर पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांची निपक्ष चौकशी करून गुन्हे खारीज करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, १४ मार्च रोजी चिखली शहरातील मुख्य रहदारी असलेल्या रस्त्यावर भाजपा कार्यकर्त्यांसोबत झालेल्या केवळ शाब्दिक बोलाचालीचा विपर्यास करून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या १८६०च्या कलमानुसार ३९५, ३९७, ५०४,५०६ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. राहुल बोंद्रे हे माजी आमदार असून, ते केवळ चिखलीस नव्हे तर जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते आहे. त्यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव असून, मोठे असे राजकीय नेतृत्व आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून, अवास्तव गुन्हे दाखल करण्यात आलेली खोटी तक्रार आणि लावण्यात आलेले कलमे राजकीय हेतूने प्रेरित व दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे विरोधकांचा शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा दुष्ट हेतू साध्य होणार नाही, या दृष्टीने दाखल गुन्ह्यांची निष्पक्ष चौकशी करून चुकीचे गुन्हे खारीज करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.