BULDHANAChikhaliVidharbha

भाजप कार्यकर्त्याला मारहाण केलीच नसल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा!

बुलढाणा (प्रतिनिधी) – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी भाजपा कार्यकर्त्यास मारहाण केलीच नसल्याचा दावा कांग्रेस नेत्यांनी केला आहे. बोन्द्रे यांच्यावरील कथित खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी नेत्यांनी केली. स्थानिक जिल्हा काँग्रेस कार्यालयात आज, रविवारी (दि.१८) घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व हर्षवर्धन सपकाळ यांनी ही मागणी व दावा केला.

यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपकडून गल्ली ते दिल्ली मनमानी व दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. ईडी, आयकर, सीबीआय विभाग मनमानी करीत आहेत. राहुल बोन्द्रे यांच्या संस्थांत पाच हजारावर कर्मचारी आहेत. त्यांच्या कुटुंबाची शंभर एकर जमीन आहे. इतकी मालमत्ता असणारा माणूस भाजप कार्यकर्त्याच्या खिशातील पाच हजाराची रक्कम व चेन हिसकावून घेईल का? हा प्रश्न आहे. पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्याचे कलम कोणत्याही पूर्वचौकशी शिवाय लावल्याचा आरोप त्यांनी केला. या दडपशाहीची चौकशी करून दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे ही आमची मागणी आहे. राहुल बोन्द्रे यांच्या दिवंगत पित्याविरुद्ध वाकदकर यांनी समाजमाध्यमावर टाकलेल्या आक्षेपार्ह ‘पोस्ट’ बद्धल काहीच कारवाई करण्यात आली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कुणीही कायदा हाती घेऊ नये – सानंदा

कायदा हा सर्वांसाठी समान असतो. कायदा आपले काम करेल त्यामुळे कुणीही कायदा हाती घेऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करून बोन्द्रे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी यावेळी बोलतांना केली. पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे नेते असले तरी याप्रसंगी हर्षवर्धन सपकाळ व दिलीपकुमार सानंदा या दोन नेत्यांनीच संबोधित केले. यावेळी काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे, राजेश एकडे, ज्येष्ठ नेते श्याम उमाळकर, विजय अंभोरे, सुनील सपकाळ, शिवसेना (ठाकरे) जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, तालुकाध्यक्ष लखन गाडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर आदी उपस्थित होते.


असे आहे प्रकरण..

१७ मार्च रोजी राहुल बोन्द्रे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपणास मारहाण केल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते श्याम वाकदकर यांनी केला होता. आपण चिखलीतील शिवाजी विद्यालय परीक्षा केंद्रावर मुलाला सोडण्यासाठी आलो असता, पाठलाग करून मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी चिखली पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणी त्याच दिवशी रात्री उशिरा बोन्द्रे व इतरांविरुद्ध भादविंच्या कलम ३९५, ३९७, ५०४, ५०६ व मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींनी गळ्यातील तीन तोळ्यांची चेन, चांदीत गठविलेले रुद्राक्ष व खिश्यातील ५ हजार रुपये हिसकावून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रकरणी राहुल बोन्द्रे यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!