गुप्तधनाचा हंडा, हिरा काढून देतो म्हणून महिलेला गंडविले; दोघा भामट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
– वर्धा येथील धक्कादायक प्रकार
वर्धा (प्रकाश कथले) – घराच्या आवारातील जमिनीत सोने ठेवलेला हंडा आहे, शिवाय हिरादेखील आहे, असे सांगून महिलेची सुमारे ५० हजार रुपयांनी फसवणूक करणार्या शिवाय, हिरा काढण्यास ९ लाखांची मागणी करणार्या दोन भामट्यांना फसवणूक झालेल्या महिलेनेच गावातील नागरिकांच्या मदतीनेच ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या भामट्यांत आसाराम नंदू वाघ आणि रोशन पिसाराम गुजर (रा.परसोळी ता.कळमेश्वर जि.नागपूर) यांचा समावेश आहे. यातील आणखी दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत .अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
वाढोणा येथील इंदिरा गुलाब राऊत या महिलेच्या घरी ९ मार्च रोजी हातात मोरपीस असलेला झाडू घेऊन दोन व्यक्ती आले. त्यातील एकाने १० रुपये मागितले. इंदिरा राऊत यांनी १० रुपये दिले असता एकाने डोक्यावर झाडू मारुन तुमच्या घरात सोन्याचा हंडा आहे, तो काढण्याकरीता ६ हजार रुपये लागतील असे आमिष दिले. या लोभात अडकून इंदिरा राऊत यांनी उसनवार घेऊन ६ हजार रुपये त्या व्यक्तीला दिले. दोघांनीही पैसे घेतले आणि तेथून निघून गेले. लूट करण्याकरीताचे सावज टप्प्यात असल्याचे लक्षात आल्याने ११ मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास दोघेही पुन्हा महिलेच्या घरी आले आणि घरातील पोर्चजवळ खड्डा करुन त्यांनी जमिनीतून हंडा काढला. त्यावेळी दोघांनीही त्या महिलेकडून पुन्हा १३ हजार रुपये घेतले. त्यानंतर दोघांनी तुमच्या घरात यापेक्षाही मोठा ऐवज आहे, एक मोठा हिरा आहे तो नंतर काढून देतो, असे म्हणत पैसे घेऊन निघून गेले. दुसर्या दिवशी फोन करुन माझ्या मित्राला २१ हजार रुपये देऊन त्याच्याकडून औषध घेऊन या, असे भामट्याने सांगितले.म् ाहिलेच्या मुलाने सकाळच्या सुमारास आर्वी बसस्थानकावर जाऊन एका व्यक्तीला २१ हजार रुपये देत औषध घरी आणले. दोन्ही आरोपी पुन्हा महिलेच्या घरी आले. इंदिरा राऊत यांच्या मुलाने औषध त्यांना दिले. त्यांनी पुन्हा जमिनीतून हंडा काढून त्या खड्ड्यात औषध टाकले आणि या खड्ड्यात मोठा हिरा आहे असे म्हणत तो खड्डा बुजवून पुन्हा दहा हजार रुपये घेऊन निघून गेले.
पुन्हा १२ मार्च रोजी महिलेच्या मुलाने सोने शोधणार्या भामट्याला फोन केला. तेव्हा त्याने हिरा काढण्याकरीता ९ लाख १० हजार रुपये द्यावे लागेल असे सांगितले. त्यावेळी राऊत यांना संशय आल्याने त्यांनी जमिनीतून काढलेला हंडा उघडून पाहिला असता त्यात सोन्याचे पॉलिश केलेले दगडाचे तुकडे तसेच काही मूर्ती होत्या. हे पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर महिलेने पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितले. दरम्यान, महिलेला या भामट्यांनी ५० हजारांनी गंडविले होते. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब गावातील काहींना सांगितली. तेव्हा त्यांनी महिलेच्या मुलाला या भामट्यांना फोन करून ९ लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यावेळी रोशन गुजर याने पैसे घेऊन जंगलात येण्यास सांगितले. जंगलात येण्यास महिलेच्या मुलाने नकार दिला. त्यानंतर आरोपी रोशन गुजर आणि आसाराम हे दोघे १७ मार्च रोजी रात्री ८.१५ वाजता महिलेच्या घरी आले आणि पैशांची मागणी करु लागले. यावेळी परिसरातील नागरिकांनी दोघांना पकडून ठेवले आणि आर्वी पोलिसांनी यांची माहिती दिली. यानंतर वाढोणा गावात येत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
—–