चिखली तालुक्यात गारांचा सडा; शेतकर्यांचे डोळे पांढरे!
UPDATE
चिखली तहसीलदारांचा डॉ. विकास मिसाळ यांना फोन; नुकसानीची घेतली माहिती!
दरम्यान, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे वृत्त वाचून, चिखलीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ यांना फोन करून गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश लगेचच तलाठ्यांना दिले असल्याचे सांगितले. कव्हळे यांच्या या कर्तव्यतत्परतेची चुणूक दिसून आल्याने, ते नुकसानग्रस्त शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही, याची सर्वसामान्य शेतकरीवर्गाला खात्री पटली आहे.
– गहू, हरभरा, कांदा पिकांसह आब्याची नासाडी
– संपावर तोडगा काढा, शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा – डॉ. विकास मिसाळ
चिखली (बाळू वानखेडे/ विनोद खोलगडे) – चिखली तालुक्यात गारांचा सडा पडला असून, अवकाळी पावसाने नंगानाच चालविला होता. या पावसामुळे गहू, हरभरा, मका, कांदा या पिकांसह आंब्याची प्रचंड नासाडी झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकर्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. मिसाळवाडी, पिंपळवाडी, शेळगाव आटोळ, अंढेरा या परिसरात तर बोराएवढ्या गारा पडल्या. या गारपिटीने आंब्याला लागलेला मोहोर व काही ठिकाणी आलेल्या कैर्या गळून पडल्या आहेत. गहू, हरभरा या पिकांची तर नासाडी झाली आहे. चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांसह लोणार, मेहकर या तालुक्यांतदेखील या गारपिटीने मोठे नुकसान झालेले आहे. राज्य सरकारने कर्मचारी संपावर तातडीने तोडगा काढून महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्यास लावून शेतकर्यांना या पीक नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ यांनी केली आहे.
चिखली तालुक्यातील जवळपास ६० गावांत गारपीट झालेली आहे. त्यामुळे गहू, हरभरा, मका ही पिके आडवी झालीत. तर कांदा, टरबूज, खरबूज, पपई, पाणतांडे यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. या भागात आंब्याला यंदा चांगला मोहोर फुटला होता. तसेच, वैâर्याही लगडल्या होत्या. मात्र गारपिटीमुळे मोहोर व वैâर्या गळून पडल्या आहेत. रब्बी हंगामावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांचे झालेल्या अतोनात नुकसानीने डोळे पांढरे झालेले आहेत. मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, पिंपळवाडी, अमोना, कोनड, अंढेरा, इसरूळ-मंगरूळ, मेरा, अंचरवाडी या परिसरात पीक नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. चिखली, हातणी, धोडप, कोलारा, शेळगाव आटोळ, चांधई, एकलारा व पेठ या सर्वच महसूल मंडळात जोरदार गाारपीट झालेली आहे. गहू, हरभरा, भाजीपाला, फळबागा या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
चिखली तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात झालेल्या गारपिटीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या नुकसानीतून शेतकरी सावरणे कठीण आहे. शेतकर्यांना वेळीच आर्थिक मदत दिली नाही तर या भागात शेतकरी आत्महत्या वाढतील. तेव्हा राज्य सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत व शेतकर्यांना एकरी २५ हजारांची मदत द्यावी, तसेच फळपिके व इतर पिकांना आवश्यक त्या प्रमाणात तातडीने मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. विकास मिसाळ यांनी केली आहे.
देऊळगाव साकरशा परिसरात पडली बोराऐवढी गार, कांदा, आंबा, टरबुजाचे नुकसान!
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा परिसरात आज दुपारी चार वाजेदरम्यान गारपीट झाली. यामध्ये बोराएवढी गार पड़ली. गारांसह पड़लेल्या पावसाने कांदा, आंबा, टरबूज यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. दे. साकरशा परिसरात जवळ जवळ अर्धा तास गारपीट झाली. त्यात वीटभट्ट्यांचेही नुकसान झाले असून, नुकसानाचा सर्व्हे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच संदीप अल्हाट, ग्रामपंचायत सदस्य रणजीत देशमुख, शे.अबरार, तंटामुक्त समिती अध्यक्ष बी. एम. राठोड यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे. तसेच मलकापूर तालुक्यासह जिल्ह्यात काही भागात गारांसह पाऊस झाल्याची माहिती आहे. दरम्यान, नुकसानीची पाहणी करण्याचे तलाठी यांना सांगितले आहे, असे मेहकरचे तहसीलदार संजय गरकल यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्या – हनुमान मिसाळ
मिसाळवाडी, पिंपळवाडी परिसरात लिंबाएवढ्या गारा पडल्या असून, गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, कापूस, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज सायंकाळच्या सुमारास तासभर लिंबाच्या आकाराची गार पडत होती. या भागातील पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तेव्हा, तहसीलदार चिखली यांनी तातडीने पंचनामे करून, शेतकर्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी आम्ही मिसाळवाडी ग्रामस्थांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी करणार आहोत, असे मिसाळवाडीचे लोकप्रिय उपसरपंच हनुमान मिसाळ यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले आहे.
बुलढाण्यात गारपीट, शेतकऱ्यांवर संकट!
बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. या दरम्यान काही भागात रिमझिम पाऊस पडला. मात्र काल सायंकाळी आणि आज दुपारी खामगाव, मलकापूर तालुक्यात प्रचंड गारपीट झाली..सोबतच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसही पडला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसलाय. शेतातल्या उभ्या पिकांचे नुकसान झालंय. यात गहू, हरभरासह इतर पिकांचं नुकसान झालंय. सुलतानी संकटासोबतच अस्मानी संकट सुद्धा शेतकऱ्यांवर कोसळलं. यात हाताशी आलेल्या गहू, हरबरा, मका, कांद्यासह फळबागांचे प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.