मिर्झा नगरवासीयांची उडाली घाबरगुंडी !
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – कधी बिबट्या, कधी अस्वल तर कधी तडस या हिंस्त्रप्राण्यांचा मनुष्यवस्तीत शिरकाव वाढत असल्याने, ‘बिबट्या आला पळा’.. अशी आरोळी कुठे ना कुठे उठतेच! बुलढाणा शहरातही मिर्झा नगर परिसरात १७ मार्चला रात्री १० वाजताच्या सुमारास बिबट्याने अर्धा तास ठिय्या दिल्याने मिर्झा नगरवासीयांची घाबरगुंडी उडाली होती. दरम्यान, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जंगल व्याप्त असलेल्या बुलढाणा शहर व जिल्ह्यात वन्य प्राण्यांची कमी नाही. अस्वल आणि बिबट यांची संख्या मोठी आहे. परिणामी, जंगल लगतच्या परिसरात अस्वल आणि बिबट्यांनी उपद्रव चालविला असून, शेतकरी शेतमजूर धस्तावला आहे. ८ मार्चला जिल्ह्यात दोन ठिकाणी बिबट्याने केलेले हल्ल्यात तीन शेतकरी गंभीर जखमी झाले होते. शेगाव तालुक्यातील डोलारखेड शिवारात घडलेल्या घटनेत सुरेश गजानन देठे व एकनाथ दिनकर लोड हे दोघे जखमी झाले तर दुसर्या घटनेत नांदुरा तालुक्यातील हिंगणा इसापूर येथे एक शेतकरीपुत्र जखमी झाला होता. बाराही महिने बुलढाणा जिल्ह्यात कुठे ना कुठे बिबट किंवा अस्वल या प्राण्यांचा माणसांवर हल्ला झाल्याची घटना समोर येते.
बिबट्याचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकर्यांना जीव मुठीत घेऊन शेतात काम करावे लागते. बुलढाणा शहरातील मलकापूर मार्गाने मॉर्निंग वाकला जाणार्या अनेक नागरिकांना अस्वल व बिबट्यांचे दर्शन नेहमी होते. मागील काही दिवसापासून मिर्झानगर भागात बिबट्या खाद्याच्या शोधात येत असल्याने या ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. १७ मार्चच्या रात्री १० वाजेच्या सुमारास मिर्झा नगरला लागून एक बिबट जवळपास अर्धा तास ठिकाणी ठाण मांडून बसलेला होता. एका व्यक्तीने त्याला कॅमेर्यातसुद्धा टिपले आहे. आज सकाळी काही रहिवासी बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पोहोचले. परंतु सुट्टी असल्याने कार्यालय बंद होते. या बिबट्याच्या बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.
———————-