राजेगाव (विशाल गवई) – सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव व परिसरात १७ मार्च रोजी रात्रीला मुसळधार पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली आणि त्यामध्ये गावातील एका घरावर वीज कोसळून घराचे नुकसान झाले. मात्र जीवितहानी झाली नाही. या घटनेने गावकरी भयभीत झाले होते.
सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथे संध्याकाळी रात्रीला विजेच्या कडकडटासह मुसळधार पावसाने गावाला चांगलेच झोडपले. रात्रीला पाउस पडल्याने घराबाहेर कुणीही नव्हते, त्यामुळे पशुपालकांच्या जनावरांचे जीव वाचले, रात्रीला विजेचा जोरदार कडकडाट सुरू असल्याने सर्व गावकरी आपआपल्या घरांमध्ये होते. परंतु, अचानक मोठ्याने विजेचा कडकडाट झाला आणि गावातील सखाराम त्रंबक शेजोळ यांच्या दोन मजली इमारतीवर वीज कोसळली. त्यामध्ये घराच्या एका बाजूचे पारपिट तुटून जमिनीवर पडले. मात्र इतर ठिकाणी घराला तडे गेल्याचे दिसून आले नाही.
एकीकडे तज्ज्ञांकडून सांगितल्या जाते की जास्त करून घरावर वीज पडत नाही. मात्र इकडे दोन मजली इमारतीवर वीज पडून मोठे नुकसान झाले असले घरांमध्ये जीवितहानी झाली नाही. हा प्रकार पाहून गावांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण रात्रीला घरात राहावे की नाही हा मोठा प्रश्न गावकर्यांना पडला आहे. या घटनेची माहिती तात्काळ ब्रेकिंग महाराष्ट्रचे राजेगाव प्रतिनिधी यांनी महसूल विभागाला कळविली. ही माहिती मिळताच घटनास्थळी अधिकारी, कर्मचारी यांनी सरपंच उमेश शेजोळ, ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत पंचनामा केला.