चिखलीच्या राजकारणाचा स्तर घसरला; पण लक्षात ठेवा ‘काटे पेराल तर काटेच उगवतील’!
– भारतभाऊ, रेखाताई, मीही चिखलीचे राजकारण केले; पण कधी वैयक्तिक पातळीवर आलो नाही!
– सोशल मीडियावरील पोस्टमुळे चिखलीच्या राजकारणाला लागतोय कलंक!
चिखली (संजय निकाळजे) – चिखलीच्या राजकारणाचा स्तर कधीही इतका घसरला नव्हता, इतका सद्या घसरलेला आहे. गेली २० वर्षे भारतभाऊ बोंद्रे, त्यानंतर १५ वर्षे रेखाताई खेडेकर, नंतर दहा वर्षे मीदेखील चिखलीचे राजकारण केले. परंतु, व्यक्तीद्वेषाची किनार कधी या राजकारणाला लागली नव्हती. आता अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात आहे. श्याम वाकतकरने सातत्याने अनेक पोस्ट फेसबुक व सोशल मीडियावर टाकल्यात, व्यक्तीगत खालच्या पातळीवर टीका करणार्या या पोस्ट होत्या. परंतु, त्याने आता तर माझे वडिल दिवंगत कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. जे व्यक्ती आता नाहीत, त्यांच्याविषयी अशा पद्धतीने लिहावे आणि पोस्ट टाकावी, व त्याला समर्थन देणार्यांनी समर्थनही द्यावे, ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. चिखलीच्या इतिहासातील ही अत्यंत काळी घटना आहे. श्याम वाकतकर या नीच प्रवृत्तीला जे समर्थन देणारे आहेत, त्यांनादेखील याचा सामना करावा लागेल, काटे पेरणार असाल तर मग काटेच उगवतील, अशा शब्दांत चिखलीचे माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आपला संताप व्यक्त केला.
श्याम वाकतकरला खरोखर मारहाण झाली का, हा प्रश्न राहुल बोंद्रे यांना विचारला असता, अनेकजण बघणारे होते, तेच खरे काय सांगतील, अशा सूचक शब्दांत राहुल बोंद्रे यांनी उत्तर दिले. राहुल बोंद्रे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून भाजपचा कार्यकर्ता श्याम वाकतकर यास मारहाण झाल्याची घटना शुक्रवार,१७ मार्चरोजी सकाळी शिवाजी शाळेसमोर घडली होती. या घटनेवरून श्याम वाकतकरने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून राहुल बोंद्रे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकतकर मुलाला शाळेत सोडण्यासाठी आले असता शिवाजी शाळेसमोर राहुल बोंद्रे व त्यांचे साथीदार यांनी मारहाण केली व गळ्यातील मौल्यवान चैन, पाकीटमधील पाच हजार रुपये घेऊन दगड मारला, असे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून राहुल बोंद्रे यांच्यासह कैलास जंगले, विजय गाडेकर, अथरोउद्दीन काजी व राहुल बोंद्रे यांचे स्वीय सहाय्यक श्लोकनंद डांगे व इतर १२ ते १३ जणांविरुद्ध भादंविच्या ३९५,३९७,५०४,५०६ कलमानुसार गुन्हे दाखल केले गेले आहेत.
सध्या श्याम वाकतकर यांच्यावर बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या कानाचा पडदा फाटल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेला आता राजकीय वळण मिळाले असून, पुन्हा एकदा विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील व माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्यात राजकीय शीतयुद्ध निर्माण झाल्याचे चित्र आहे.
चिखलीतील एक गट सोशल मीडियावर सातत्याने व्यक्तीद्वेषाच्या पोस्ट टाकत असून, या पोस्ट खासगी टीका करणार्या तर असतातच; पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) या पक्षाच्या नेत्यांचे चारित्र्यहनन करणार्यादेखील असतात. तसेच, काँग्रेसचे नेते राहुल बोंद्रे यांच्यावरही खालच्या पातळीवर शेरेबाजी केलेली आढळून येते. एका राजकीय पक्षाच्या मीडिया सेलकडून आलेल्या पोस्ट शेअर करणारे तर या पोस्टला एखाद्या ग्रूपवर प्रतिवाद केला तर अत्यंत खालच्या पातळीवर टीकाटिप्पणी करतात. त्यामुळे सोशल मीडियावरून चिखलीत काही अनुचित प्रकार घडण्याआधी सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या चिखलीतील संबंधित व्यक्तींना पोलिसांनी हुडकून काढून वठणीवर आणण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया सोशल माध्यमांवर सक्रीय असलेल्या सुज्ञ नागरिकांतून उमटत आहेत.
———————-