– खामगाव तालुक्यात मोठे नुकसान, तहसीलदारांकडून पाहणीचे आदेश
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरूच असून, १७ मार्च रोजी रात्रीदरम्यान वादळी वारा, विजेच्या कड़कड़ाटासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये रब्बीचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पाटावरील पाण्यावर पेरलेला गहू, हरभरा तर पूर्णतः झोपला आहे. यामुळे शेतकरी आणखी संकटात सापड़ला आहे. यामध्ये खामगाव तालुक्यात मोठे नुकसान झाल्याची माहिती असून, नुकसानीच्या पाहणीचे आदेश तहसीलदार अतुल पाटोळे यांनी संबधितांना दिले आहेत. दरम्यान,१७ मार्च ही लग्नाची तारीख दाट होती पण अचानक आलेल्या वादळी पावसामुळे लग्नमंड़पी व वर्हाडाची एकच धांदल उड़ाली होती.
यावर्षी पावसाळा संपत असताना बेमोसमी पावसाने कहर केला. त्यामुळे खरिपाची पिके हातून गेली. शेतकर्यांची भिस्त रब्बी पिकावर होती. जास्त पाऊस झाल्याने धरणे, विहिरी तुड़ूंब भरल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, मका, कांदा, भाजीपाला, मोहरी आदि पिके घेतल्या गेलीत. तर फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत. १७ मार्चच्या दुपारी व रात्री जिल्ह्यातील मेहकर, चिखली, लोणार, बुलढाणा, मेरा बु., देऊळगाव साकरशा, सिंदखेडराजा, जानेफळ, खामगाव, शेगावसह इतरही भागात जोरदार अवकाळी पाऊस पड़ला. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव, शहापूर, पळशी, संभापूर, कदमापूर, आंबेटाकळी, शिर्ला नेमाने, लोखंड़ा, पाळा, बोरीअड़गावसह इतर भागात तर वादळीवारा, विजेच्या कड़कड़ाटासह धुव्वाधार पाऊस बरसल्याने उभा गहू व हरभरा भुईसपाट झाला असून, पाटाच्या पाण्यावर पेरलेल्या पिकांचे नुकसान जास्त आहे. तसेच या पावसामुळे जिल्ह्यात रब्बीसह कांदा, भाजीपाला, टरबूज, लिंबू, आंबा, भाजीपालासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात वीजपुरवठाही खंड़ीत झाला होता. तर १७ मार्च ही लग्नाची तारीख खूपच दाट होती. दरम्यान अचानक पाऊस व वादळ आल्याने लग्न मंड़पीची एकच धांदल उड़ाली तर यामुळे उशिरा लागणारे लग्नसुध्दा वेळेवरच उरकण्यात आले. गेल्या १५ दिवसात जिल्ह्यात तिसर्यांदा अवकाळी पाऊस पड़ला असून, यामुळे नुकसान मात्र वाढतच चालले आहे. शेतकर्यांवरील संकट आणखी गड़द होत आहे, तर सर्वेक्षण करून मदतीची अपेक्षा शेतकरी करत आहे. दरम्यान, २० मार्चपर्यंत हवामान खात्याचा पावसाचा अंदाज असून, सोंगून ठेवलेल्या पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केलेले आहे.
अवकाळी पावसामुळे खामगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची कृषी विभाग व तलाठी यांना पाहणी करण्याचे सांगितले आहे.
– अतुल पाटोळे, तहसीलदार खामगाव
सद्या महसूल व कृषी कर्मचारी संपावर आहेत. त्यातच २८ तारखेपासून अधिकारीदेखील संपावर जाणार आहेत. कर्मचार्यांच्या संपामुळे महसूलची कामे ठप्प पडली असून, पिकांच्या नुकसानीचे पंचनामेदेखील रखडले असल्याचे दिसून येत आहे.