MaharashtraPolitical News

फुटीर गट बॅकफूटवर; उद्धव ठाकरे यांचा अत्यंत आदराने “साहेब” म्हणून उल्लेख! फुटीर गटाचे नेते सोडून भलतेच प्यादे गेले पत्रकार परिषदेला सामोरे!! आगातिक, असहाय्य, केविलवाणे आर्जवे!

बुलडाणा(जिल्हा प्रतिनिधी) फुटीर गटाची आजची भाषा एकदम मवाळ झालेली वाटली. “आम्ही अजून शिवसेनेत आहोत. आमची आमच्या नेत्यांविरोधात नाराजी नाही. आम्ही उद्धवसाहेबांचा आदर करतो. आदित्य ठाकरे काय, संजय राऊत काय, सगळ्यांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. मराठी माणसाच्या मनात शिवसेना आहे. उद्धव साहेबांचा महाराष्ट्रात एक दर्जा आहे…” फुटीर गटाची गेल्या 3-4 दिवसांतील आक्रमक भाषा जाऊन आता एकदम मवाळ आणि पालटलेला सूर आजच्या पत्रकारपरिषदेत दिसला. एकूणच ही फुटीरता कायदेशीर, तांत्रिक गोचीत अडकल्याने, तसेच “महाशक्ती”ने हात वर केल्याने आता फुटीर गट फारच बॅकफूटवर गेल्याचे, असहाय्य आणि आगतिक झाल्याचे स्पष्टपणे जाणवले. अगदी केविलवाणे आर्जवे त्यांनी केली जणू. फुटीर गटाच्या पत्रकार परिषदेत गटाचे नेते सोडून दुसरेच कुणीतरी अधिक बोलले. नेता सोडून प्यादे बोलण्याचा, त्याने भूमिका मांडण्याचा, पत्रकारांना सामोरे जाण्याचा हाही प्रकार अजबच! फुटीर गटाच्या नेत्याविषयी गुंगीच्या औषधाची बातमी आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते स्वतः पत्रकार परिषदेला का सामोरे गेले नाही, हाही प्रश्न संशय गडद करून उपस्थित होऊ शकतो.

  फुटीर गटापुढे आता कुठलाही, त्यांना हवा किंवा अपेक्षित तसा ठोस पर्याय उरलेला नाही. तमाम कायदेतज्ञ, विधिमंडळात अनेक वर्षे काम केलेले ज्येष्ठ, निवृत्त अधिकारी सांगताहेत, त्यानुसार *फुटीर गटासमोर फक्त विलिनीकरण हाच पर्याय आहे – भाजपामध्ये जा, नाहीतर प्रहारमध्ये विलीन व्हा!* स्वतंत्र गट होणार, खरी शिवसेना आम्हीच वैगेरे वैगेरे स्वप्न धुळीस मिळाली आहेत. फुटिरांवर कारवाई होण्यापूर्वी म्हणणे मांडण्यास सात दिवसांची मदत मिळावी, ही अपक्ष आमदारांमार्फत पत्राद्वारे केलेली मागणी अयोग्य आणि बेकायदेशीर ठरली आहे. स्वतंत्र गट म्हणून मान्यता नसल्याने फुटिरांच्या सर्व हालचाली आणि दावे हे निरर्थक, फोल ठरत आहेत. त्यातच राज्यपाल राजभवनात नाहीत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना अध्यक्ष नसतांना घटनेने अमर्यादित अधिकार बहाल केल्याची जाणीव आता फुटीरांना झालेली दिसतेय. त्यांच्या बंडाचा टिकाव लागतो की नाही, पदे राहतात की नाही, याची धास्ती जाणवायला लागली दिसत आहे. अपात्रातेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. अपात्रतेचा फटकन निर्णय घेतला गेला तर तो घटनात्मक बरोबर की चूक, वैध की अवैध, अधिकार आहे की नाही … वांझोट्या चर्चांना अर्थ नाही; पण पुन्हा पद मिळवायला कोर्टात जाऊन लढत बसावे लागेल. अपात्रता झाली तर भविष्यात आमदारकीचे कुठलेही लाभ मिळत नसतात, हे फुटीर आमदार चांगलेच जाणून आहेत. या सर्व अस्वस्थ आणि धीर सुटलेल्या आमदारांचा पडद्याआडून सारा दबाव फुटीर नेत्यावर नक्कीच असेल. त्यामुळे बंडातला जोर निघून गेलेला जाणवत आहे. बंडोबा थंडोबा झालेले स्पष्टपणे दिसत आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत फुटिरांचे नेतेपद काढून घेतलेले नाही. या मेहेरबानीची जाणीव झालेली आहे. परतीचा थोडासा दोरखंड सेनेने ठेवलेला आहे. तो कापला जाणार नाही, तुटणार नाही, याची पूर्ण काळजी फुटिरांच्या पत्रकारपरिषदेत घेतली गेली. एका अवाक्षराने सेनेला, उद्धव, आदित्य आणि राऊतांना दुखावले गेले नाही. *ही फुटीर गटाच्या नेत्याची पत्रकार परिषद कमी आणि दोन गटात एका त्रयस्थ मध्यस्थाने सुरू केलेली चर्चाच अधिक वाटत होती.*

             थेट पांढरे निशाण अजून फडकावलेले नसले तरी फुटीर गटाने तहाची बोलणी सुरू केल्याचेच हे लक्षण मानायला हवे. अगदी असहाय्यपणे आम्हाला घटनात्मक अधिकार मिळायला पाहिजे, अशी मागणी केसरकरांनी केली. आम्हाला आमचे अधिकार मिळू दिले जात नाही, अशी तक्रार केली. गंमत आहे, त्यासाठी हे काही योग्य व्यासपीठ नव्हते. सहानुभूती मिळवण्याचा तो प्रयत्न असावा. ही गाऱ्हाणी मांडण्यासाठी मुंबईत यायला हवे, राज्यपालांना भेटायला हवे, 37 सेनेची फुटीर डोकी मोजून दाखवायला हवी. सभागृहात, घटनात्मक आणि कायदेशीर पीठांपुढे करायची मागणी, मांडायचे म्हणणे पत्रकारांना सांगून उपयोग काय? त्यांना नेमके उमगले नाही तर धड बातमीही नाही व्हायची. उद्धव साहेबांच्या प्रेमाची आणि भेटीची कमतरता झाली, ही भाषा खूपच सारवासारवीची होती. भाजपाशी कुठलीही चर्चा झालेली नाही, ऑफर नाही, असे आवर्जून सांगितले गेले. आमच्या विमान आणि हॉटेलचा खर्चही आम्हीच करत आहोत. तुम्ही का वारंवार हे असले (नको ते) प्रश्न विचारताय, असे पत्रकाराला खेकासून, चिडूनच विचारले गेले.

          व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घ्या, आमच्याशी बोला, अशी मागणी फुटीर गटाने केली. मात्र, अधिकारीदृष्ट्या विधिमंडळ कार्यालयाला हे कसे करता येईल? तुम्ही पळून गेलात राज्याबाहेर हे त्यांना ऑफिशियली कुठे माहिती आहे अजून. तुम्हाला प्रत्यक्ष भेटून किंवा इतर योग्य, वैध, घटनात्मक मान्य आणि त्रुटीविरहित मार्गाने प्रथम विधिमंडळ कार्यालयास कळवावे लागेल, की आम्ही बंड केलेय, 2/3 आहोत. ते सिद्ध करावे लागेल, गटाला मान्यता घ्यावी लागेल. *गुवाहाटीतून उंटावरून शेळ्या कितीही हाकल्या तरी त्या कायदेशीर, घटनात्मक वैध नाहीत.* याशिवाय, विधिमंडळ कार्यालयाला ऑनलाईन संवाद साधायचा तर बसले आणि केली गुगल किंवा झूम मीट असे होत नाही. NICने नमूद करून दिलेल्या ठराविक बँडविडथवरच ठराविक मार्गानेच हे केले जाऊ शकते. आता हे फुटीर गटाच्या बोलबच्चनना माहिती नसावे, म्हणजे कमालच!

               आता पुन्हा मूळ मुद्दा… काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्तेतून बाहेर पडण्याचा, जी मागणी फुटीर गटाने केली होती. त्याला तर उद्धव यांनी मान्यता दिली आहे. राऊतांनी जाहीर सांगितले आहे, तुम्ही या, आपण बाहेर पडू. उद्धव यांनी तर पद सोडण्याचीच काय सत्ता सोडून विरोधात बसायचीही तयारी दाखविली आहे. वाटले तर तुमच्यातला कुणीही मुख्यमंत्री व्हा, असा शब्दही दिलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ठामपणे उद्धव यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यांनीही सत्ता सोडून विरोधात बसायची पूर्ण तयारी असल्याचे इरादे जाहीर केले आहेत. त्यामुळे फुटिरतावाद्यांच्या नेत्याची आणखीनच गोची झाली आहे. कारण, *ही सुपारी काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर असलेली सत्ता सोडण्याची नाहीच आहे.* सत्ता गेली तर फुटीर म्होरक्यासह सर्व फुटीर आमदार “सत्तेविना प्राण तळमळला” या स्थितीत जातील. हिंदुत्व वैगेरे सब झूठ आहे. निधी मिळत नसल्याच्या, अन्याय वैगेरे बोंबाबोंबीचा सोशल मीडियावर भांडाफोड होत आहे. असो. तर *सुपारी आहे ती भाजपाबरोबर जाऊन बसण्याची.* सुपारी घेतली गेली असेल, फोडली असेल तेव्हा या सर्व बारकावे, धोक्यांची जाणीव नसावी. त्यामुळेच आता आमदारकी राहते की जाते, अशी स्थिती निर्माण झाल्याने फुटीर गट हादरला आहे.

             आसामात नामांकित पंचतारांकित हॉटेलात मुख्य शेफ असलेल्या एका मित्राने सकाळीच गुवाहाटीचा अर्थ सांगितला. *”गुवा” म्हणजे सुपारी आणि “हाट” म्हणजे बाजार. गुवाहाटी म्हणजे सुपारीचा मुख्य बाजार असलेले शहर.* सुपारीचा जागोजागी, गल्लोगल्ली, रस्तोरस्ती बाजार भरतो. अर्थात तिथला सर्व बाजार हा महिलांच्या ताब्यात आहे. त्याच सुपारीची पर्यटकांना विक्री करतात. बाहेरील पर्यटक तिकडे जाऊन सुपारी विकत घेऊन घरी आणतात. आसामच्या भाजपाच्या मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत तिकडे गेलेले बाहेरील काही पर्यटक मात्र घरूनच सुपारी घेऊन तिकडे गेले. या सुपारीबाजांनी आता तिकडेच “शाळा” भरविली आहे. मात्र, त्यांची ही कच्च्या चेल्यांची शाळा निघाली. त्यांचा गुरुजीही कच्चा लिंबूच असावा. कारण जिथून हे पर्यटक सुपारी घेऊन गेले, तिथल्या महावस्ताद महागुरूने असा काही “धडा” आता शिकवायला घेतला आहे, की सुपारीबाज पर्यटकांची “शाळा” होणार हे नक्की!!

           आसामात “तेल लावलेले पहिलवान” नसतात, तिकडे फक्त गेंडे असतात; “तेल लावलेला पहिलवान” असतो फक्त महाराष्ट्रात. हा महागुरू, महापहिलवान कुणाच्या हाती लागत नाही, इतक्या वर्षात लागला नाही. आता कुणी त्याच्या ताब्यातून सत्ता हाती घेण्याची स्वप्न पाहत असेल तर मग… या कच्च्या लिंबूंची कीव येते. अजून यांना खूप काही शिकायचे आहे. उगाच आपले “उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग”. त्यामुळे यांची “शाळा”ही होणार आणि “तेल लावलेला पहिलवान” या उतावीळ नवऱ्यांना चारी मुंड्या चीत करत “धोबीपछाड”ही देणार. आपले राजाभाऊ इंजिनवाले एकदा म्हणाले होते, पाऊस नसतांना कशाला ना उगाच! पण आता तर पाऊस आहे, आसामात धो-धो कोसळतोय आणि आपल्याकडेही 5 दिवस जबरदस्त बरसणार आहे. पावसातील तुफानी बॅटिंगचा अनुभव असलेला, पाऊस लकी ठरणारा पहिलवान आता तर तेल न लावताही मैदानात उतरून धम्माल उडवून देऊ शकतो. *पाणी मे आग लगी… दिसणारच आहे. पुराच्या पाण्यात वाहून जायचे नसेल किंवा या पावसात लागलेल्या आगीत जळून खाक व्हायचे नसेल तर कुठेतरी शरण तर जावेच लागेल.
              आता जाता-जाता तीच एक अंदर की बात – ज्या मामुच्या भरवशावर उतावीळ नवरे शाळा करू पाहत होते, त्याने हात वर केले आहेत. त्याला वरून ग्रीन सिग्नलच नाही. मामु कितीही वळवळ करीत राहिले तरी उपयोग नाही. कारण वरच्या मंडळींनी, मलबारहिलवरील धोतर-टोपीवाल्या आजोबांना कधीच सुट्टीवर पाठवून देत जबरदस्त मास्टरस्ट्रोक खेळला आहे. थंडा करके खाते-खाते सब थंडे पड जायेंगे. असो. मुद्द्याची जाता-जाता सांगायची बात तर राहिलीच – तर या मामुबरोबर जे दादासाहेब मलबार हिलवरील धोतर-टोपीवाल्या आजोबांकडे भल्या पहाटे गेले होते ना, त्यांनाच आता शरण जायचे ठरले आहे. मामुंनी सांगितले आहे, चेल्यांना सांभाळून घ्या. “पुतण्या मला वाचवा,” अशी आर्त साद कच्च्या लिंबू चेल्यांनी घातली आहे. हनुमंती, भीमसेनी, जांबुवती, जरासंधी अशा सर्व कुस्ती प्रकारात आणि 27 डावात माहीर असलेल्या काकांची कैची तर आता बसलीच आहे. या कैचीतून सुटका करा, अशी पुतण्याकडे विनवणी होत आहे. पुतण्यावर काकांना मनवण्याची जबाबदारी आहे. काका 2-4 दिवसात कदाचित पटतील. भरकटलेले पर्यटक काकांच्या आश्रयात येतील. त्यांना तंबी देऊन सोडले जाईल. कायदेशीर सोपस्कार आटोपून यथावकाश पद बहाल राहतील, असा सुटकेचा निःश्वास ते टाकू शकतील. या स्क्रिप्टच्या अलीकडे-पलीकडे पुन्हा परस्पर नवीन काही शाळा या मंडळींनी केली तर मग काही खरं नाही. मग ते आहेत आणि त्यांचे नशीब. मामु-पुतण्या… कुणीच त्यांना मदतीचा हात देणार नाही. शेवटची गंमत – फुटीर गटाचे बोलंदाज हे आज शिवसेनेचे किंवा फुटीर गटाचे नव्हे, तर NCPचे असल्यासारखे वाटत होते ना? हो की नाही? हो ना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!