‘समृद्धी’प्रमाणे सुरत-चेन्नई महामार्गाच्या बाधित शेतकर्यांना मोबदला द्या!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – समृद्धी महामार्ग करताना ज्याप्रमाणे शेतकर्यांना जो मोबदला दिला आहे, त्याचप्रमाणे सुरत-चेन्नई महामार्गामध्ये गेलेल्या बाधित शेतकर्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकर्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर दौर्यावर शनिवारी आले असता, याप्रसंगी त्यांनी जिल्हा नियोजन समिती येथे सुरत चेन्नई महामार्ग मध्ये बाधित झालेल्या शेतकर्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकी प्रसंगी शेकडो शेतकर्यांनी नियोजन भवनांमध्ये गर्दी करून पालकमंत्री यांच्यासमोर मत मांडले. सुरत चेन्नई महामार्ग साठी कमीत कमी एक लाख ८४ हजार ते बागायतीसाठी सहा ते आठ लाख रुपये पर्यंत मोबदला देण्याच्या नोटिसा शेतकर्यांना देण्यात आले आहेत. परंतु सध्या चालू बाजारभावाप्रमाणे शेतकर्यांना शेतीचे मूल्य द्यावे. अशी आग्रही मागणी शेतकर्यांनी याप्रसंगी केली. समृद्धी महामार्गाला वेगळे आणि सुरत चेन्नई महामार्गाला वेगळा दर कशासाठी असा प्रश्नही उपस्थित केला. सुरत चेन्नई महामार्ग मध्ये बाधित झालेल्या शेतकर्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे वाढीव मोबदलाबाबत निवेदने, ईमेल दिली. परंतु याचा कोणत्याही प्रकारे प्रशासनाने दखल घेतली नाही. तरी आमची एवढीच मागणी आहे की चालू बाजार भावाप्रमाणे शेतकर्यांना मूल्य द्यावे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना जो भूसंपादनाचा कायदा आणला होता तो रद्द करावा. या जुन्या कायद्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. सुरत चेन्नई महामार्ग अनेक गावामधून गेला आहे त्या ठिकाणी प्लॉटिंग पडले आहेत. त्या प्लॉटिंग प्रमाणे दर द्यावा, त्यासाठी गुणांकांमध्ये वाढ करण्याची मागणी याप्रसंगी शेतकर्यांनी केली. याबरोबरच सुरत चेन्नई महामार्ग करताना शेतकर्यांची कोणत्याही प्रकारे मते घेण्यात आली नाहीत. परंतु एका गावातून महामार्ग जात असताना त्या गावाचे दोन तुकडे होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव विस्थापित होणार आहे. शेतकर्यांना अलीकडून पलीकडे जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
दरम्यान, या सर्व प्रश्नावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्यांच्या भावना विचारात घेता राज्य सरकारकडे आपण बैठक लावून याबाबत तोडगा काढू असे आश्वासन शेतकर्यांना दिले. या बैठकीप्रसंगी सोलापूरचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजाभाऊ राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यासह नॅशनल हायवेचे अधिकारी उपस्थित होते.
भैय्या देशमुख यांच्या पिशवीतून निघाले कांदे!
सध्या कांद्याचा वादा झाला असून कांद्याचे दर कवडीमोल झाले आहेत. याचा निषेध म्हणून जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी पालकमंत्री यांना दाखवण्यासाठी कांदे पिशवीमध्ये आणले होते. परंतु हे कांदे आणताना त्यांनी कॅरीबॅगमध्ये गुलाबाचा हार वरच्या बाजूला ठेवला आणि त्या खाली कांदे ठेवले होते. परंतु पोलीस प्रशासनाने कॅरीबॅगची झाडाझडती केली असता त्यामधून कांदे बाहेर काढून ताब्यात घेतले.
शेतकर्यांच्या लढ्याला मालोजीराजे यांचा पाठिंबा!
सुरत चेन्नई महामार्ग मध्ये ज्या बाधित शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकर्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी अक्कलकोट संस्थांनचे राजे मालोजी राजे यांनी उपस्थित राहून त्या शेतकर्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे मत व्यक्त केले.
—————–
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कांद्याला हमीभाव द्यावा या मागणीचे निवेदन न स्वीकारल्यामुळे सोलापुरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. सोलापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठक सुरु असलेल्या नियोजन भवनात शेतकऱ्यांनी यावरून गोंधळ घातला. कांद्याला हमीभाव द्यावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विखे पाटील यांनी राजीनामा देण्याची मागणी केली.