– यात्रेसाठी पाच ते सहा लाखांचा समुदाय येण्याची शक्यता
– दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ६ तारखेला नारळांची होळी
चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील सैलानी येथे दि. २ ते दि.१७ मार्च या कालावधीत सैलानीबाबा यांचा १९६ वा उर्स महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त दि. २ मार्च ते दि. १७ मार्चपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर अधिसूचनादेखील काढण्यात आली असून, या अधिसूचनेची रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले यांनी अमलबजावणी सुरू केली आहे.
सैलानी येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिनांक ०६ मार्चरोजी होळी उत्सव साजरा होणार असून, नारळांची होळी करण्यात येणार आहे. शेख रफिक मुजावर यांच्या घरुन हजरत अब्दुल रहेमान उर्फ सैलानी शाह मिया यांची संदल मिरवणूक उंटनीवर निघून दर्गाह या ठिकाणी पोहोचून चादर व संदलचा लेप लाऊन संदल दिनांक १२ मार्च रोजी चढविण्यात येणार आहे. तसेच दि.१६ मार्च रोजी सकाळी ०९.०० वाजेदरम्यान सैलानी बाबा दर्गा याठिकाणी फातेहाखानीचा कार्यक्रम होणार आहे. सैलानी बाबा उर्स महोत्सवात सर्वधर्मीय भाविक लोक सामिल होतात. तसेच सदर यात्रेत महाराष्ट्रातून तसेच लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे यात्रेत अंदाजे ४ ते ५ लाख लोकांचा जमाव एकत्र येतो. त्याअनुषंगाने सैलानी यात्रेत खबरदारीच्या सर्व उपाय योजना पोलिस प्रशासनाकडून राबविल्या जात आहेत.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा वाहतूक मार्ग क्र. २६ वरील पिंपळगांव सराई ते ढासळवाडी व ढासळवाडी ते पिंपळगांव सराईपर्यंत जाणारी एस.टी. बसेस, जड वाहतूक, खाजगी वाहतूक दि. ०२मार्च ते दि. १७मार्च पर्यंत वळविणे बाबत अधिसूचना आदेश काढण्यात आली असून, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले यांनी सदर वाहतूक बदल केला आहे.
वाहतूक मार्गात बदल
सैलानी यात्रेनिमित्त रायपूर, पिपळगाव सराई, सैलानी, डासाळवाडी, दुधा या मार्गावरील वाहतूक रायपूर, मातला. केसापूर, माळवंडी, दुधा या मार्गानि वळविण्यात आली आहे. २ ते १७ मार्च दरम्यान वाहतुकीत हा बदल राहणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी स्पष्ट केले आहे.
—————–