बुलढाणा (खास प्रतिनिधी) – येथील टिळक नाट्य क्रीडा मंदिर परिसरात असलेले राष्ट्रीय प्रतीक सम्राट अशोक स्मारकाचे सौदर्यीकरण व विकास करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारींना एका निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अदम्य साहस व न्यायाचे प्रतीक, आणि वैभवशाली इतिहासाचा ठसा उमटविणारा विश्वविख्यात प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक युध्द सोडून बुध्दचरणी लिन झाले. जगाला हेवा वाटावा असे महानतेचे प्रतीक म्हणजे अशोकस्तंभ आहे. बुलढाण्यात अशोक स्तंभ स्थापनेनंतर सुरुवातीचे दिवस वगळता कित्येक वर्षापासून ते स्मारक दुर्लक्षित होत गेले आज रोजी ते झाडे झुडपे व घाणीच्या विळख्यात असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे अशोक स्तंभासमोरील रस्ता हा मुख्यत्वे जिल्हा सत्र न्यायाधीश, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक निवासस्थान, जिल्हा विश्रामगृह, लोकप्रतिनीधींच्या कार्यालयांकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे. असे असतांना देखील याचे गांभीर्य कुणालाच कसे नाही. याकडे शासन व प्रशासनाने उपायोजना करावी. तसेच स्मारकाच्या संपूर्ण परिसरात कोठेही अतिक्रमण व बांधकाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. २९ मार्च २०२३ रोजी सम्राट अशोक जयंतीच्या पावनपर्वाच्या निमीत्ताने शहरातील बहुसंख्य नागरीक स्मारकास अभिवादन करणार आहेत. तेव्हा सम्राट अशोक स्मारकाचे सौदर्यीकरण व विकास करण्यात यावा, अशी मागणी अंबादास घेवंदे, शैलेश खेडकर, अमोल रिंदे पाटील, मिलींद वानखडे, गजानन ससाने, सुरेश सरकाटे, राजीव वानखेडे, अनिल वाघमारे,उमेश पाटील, आशिष गायके यांनी केली आहे.
अशोक स्तंभाची कधी झाली स्थापना?
स्वतंत्र भारतात राष्ट्रीय चिन्हाची घोषणा होताच त्या स्तंभाची प्रेरणा व राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून सम्राट अशोक स्मारकाची स्थापना सर्व प्रथम वर्हाड मध्य प्रान्त (स्वतंत्र महाराष्ट्र स्थापनेपूर्वी) बुलढाणा येथे सन सप्टेंबर १९५७ ते १९५८ रोजी करण्यात आली. त्याकामी जिल्हाधिकारी व नगराध्यक्ष व जेष्ठ नागरीकांचे सहकार्य लाभले होते.
————-