बारावी गणिताचा पेपरफुटीप्रकरणी सहा संशयित साखरखेर्डा पोलिसांच्या ताब्यात!
– उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी तातडीने हलविली सूत्रे!
सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी) – सिंदखेडराजा तालुक्यातून काल इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर सोशल मीडियावर परीक्षेआधीच व्हायरल झाला होता. या पेपरफुटीप्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेत, संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, काल रात्री सिंदखेडराजा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर, गुन्हा घडला ते स्थळ साखरखेर्डा पोलिस ठाणेहद्दीत असल्याने हा गुन्हा साखरखेर्डा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी स्वतः या तपासात लक्ष घातले असून, आतापर्यंत सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांमध्ये शेंदूरजन, बिबी, किनगावजट्टू, व भंडारी या गावातील भामट्यांचा समावेश आहे. या भामट्यांकडून पोलिस स्टाईलने कसून तपास सुरू असून, पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आज रात्रीपर्यंत उलगडेल, असा पोलिसांना विश्वास आहे.
काल, दिनांक ३ मार्चरोजी बारावी गणिताचा पेपर हा सोशल मीडियावर खास करून व्हाटसअपवर व्हायरल झाला होता. परीक्षा सुरू होण्याच्या अर्धातास आधी पेपर फुटल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. सकाळी साडेदहा वाजता हा पेपर साखरखेर्डाजवळील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले होते. गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेची दोन पृष्ठे ठरावीक मोबाईल क्रमांकावर व्हायरल झाली होती. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांनी लगेचच दिल्याने राज्यात खळबळ उडाली होती. तसेच, विरोधी पक्षाने सरकारला विधिमंडळात चांगलेच धारेवर धरले होते.
शिक्षणमंत्र्यांनी तपासाचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी रात्री गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी सिंदखेडराजा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु, परीक्षा केंद्र हे साखरखेर्डा पोलिस ठाणेहद्दीत असल्याने हा गुन्हा आज साखरखेर्डा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. या पेपरफुटी प्रकरणाचा तपास साखरखेर्डाचे ठाणेदार नंदकिशोर काळे, नितीन जाधव, रामदास वैराळ हे उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या ार्गदर्शनाखाली करत आहेत. या तपास पथकाने आजच्या आज संशयितांच्या मुसक्या आवळत त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची खास पोलिसी स्टाईलने चौकशी सुरू असून, लवकरच धागेदोरे हाती लागण्याचा पोलिसांना विश्वास आहे.
————–