सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना आपल्या स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत वेगवेगळे साहित्य वाटपाची सोडत गुरुवारी निघाली. परंतु आलेल्या ३ हजार लाभार्थ्यापैकी दीड हजार लाभार्थी लाभापासून वंचितच राहणार आहेत. यामुळे या लाभार्थ्यांचे स्वप्न भंगणार आहे.
अनुसूचित जाती व जमातीचे एक हजार २७६ व ५१८ दिव्यांग लाभार्थ्यांना दोन कोटी ५६ लाख ९९ हजार रुपयांचे साहित्य खरेदीसाठी अनुदान वाटपाची सोडत गुरुवारी काढण्यात आली. लकी ड्रॉ (चिठ्ठ्या टाकून) पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असले तरी या नावाचे निवडीमध्ये आपला लाभार्थी निवडावा यासाठी अनेकांनी वशिलेबाजी लावली असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून समाज कल्याण विभागामार्फत (सेस फंडातून) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (२० टक्के) व दिव्यांग लाभार्थ्यांना (५ टक्के ) व्यवसायाभिमुख साहित्यासाठी अनुदान देण्यात येते. चालू आर्थिक वर्षांसाठी (२०२२-२३) दोन कोटी ५६ लाख ९९ हजार इतकी तरतूद सेस फंडातून या योजनेसाठी करण्यात आली आहे. त्या त्या तालुक्याच्या पंचायत समित्यांमार्फत पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागवून त्या प्रस्तावांची छाननी करुन गुरुवारी जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात चिठ्ठयांद्वारे लाभार्थी निश्चित करण्यात आले.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया झाली. साहित्याचे नाव व सोडतीत भाग्यवान ठरलेल्या अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांची संख्या व कंसात एकूण अनुदानाची रक्कम पुढील प्रमाणे – शिलाई मशीन – ३५२ लाभार्थी (३० लाख रुपये), सायकल – ५०० (२५ लाख), पिठाची चक्की – ३५८ (६९ लाख ९९ हजार रुपये) व झेरॉक्स मशीन – ६६ (३० लाख रुपये) त्य व दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या, साहित्य व एकूण अनुदान पुढील प्रमाणे – शेळी गट १३९ (६७ लाख रुपये), पिठाची गिरणी २५१ लाभार्थी (४९ लाख रुपये) झेरॉक्स मशीन १०८ लाभार्थी (४९ लाख रुपये).
———————