– प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देणार्या परीक्षा केंद्रप्रमुखाला बजावली नोटीस
– शिक्षण विभागाकडून आता कारवाईचा सपाटा सुरू
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – इयत्ता बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी खंबीर भूमिका घेतल्यानंतर शिक्षण विभागाने कर्तव्यात कुचराई करणार्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला आहे. काल उशिरा सिंदखेडराजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर, आज सिंदखेडराजा तालुक्यातील पाचही केंद्रांचे प्रमुख तसेच पेपर रनर बदलण्यात आले आहेत. तसेच, या पेपरफुटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देणार्या बुलढाण्यातील परीक्षा केंद्र प्रमुखांना शिक्षणाधिकारी यांनी कारणा दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष धक्कादायक बाब अशी, की गणिताचा पेपर हा निर्धारित वेळेच्या अर्ध्या तासापूर्वीच बाहेर आला होता. आणि, तो राजेगाव परीक्षा केंद्रावरून फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून गंभीर देखील घेऊन सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. राजेगाव हे साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.
काल बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात बारावी गणिताचा पेपर फुटल्याची घटना घडली होती. सकाळी साडेदहा वाजताच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.याप्रकरणी विधिमंडळातही विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी तर शिक्षणमंत्र्यांचे चांगलेच वाभाडे काढले होते. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी केली असता, हा पेपर सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव परीक्षा केंद्रावरून फुटल्याचे निष्पन्न झाले. हे केंद्र साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीत येत असल्याने काल सिंदखेडराजात दाखल झालेला गुन्हा आज साखरखेर्डा पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. पोलिस या अज्ञात आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या घटनेची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्र क्रमांक ६०३, ६०४, ६०५, ६०७ व ६१७ चे केंद्रप्रमुख व रनर तडकाफडकी बदलण्यात आले आहेत.
या पेपर फूट प्रकरणी माध्यमांना प्रतिक्रिया देणं केंद्र संचालकला भोवणार असल्याचे समजते. ज्या केंद्र संचालकांनी व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर गणिताचा पेपर दाखवला त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करत असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात बुलढाणा शहरातील एका केंद्र संचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. केंद्र संचालकांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना परीक्षा सुरू असताना आणि परीक्षा काळात कॅमेऱ्यासमोर मूळ प्रश्नपत्रिका दाखवली. त्यामुळे परीक्षा गोपनियतेच्या नियमांचा भंग झाल्याचा केंद्र संचलकांवर आरोप ठेवण्यात आला. तसा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवत असल्याचे बुलढाणा जिल्हा शिक्षण अधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सांगितले.