ChikhaliHead linesVidharbha

पोत्याने नारळं फोडली, पण कामे कुठे झाली?; आ. शिंगणेंनी माजी आ. खेडेकरांना काढले जोरदार चिमटे!

– सत्ता नसली तरी मतदारसंघाचा विकास थांबू देणार नाही – आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे

चिखली (सुनील मोरे) – मागच्या काळामध्ये पोत्यांनी नारळ फोडल्या गेले. परंतु प्रत्यक्षात कामे झालेली कुठे दिसत नाहीत. ज्या पद्धतीने उदघाटने झाली त्या पद्धतीने विकास झाला असता तर लोकांनी मला निवडून दिले नसते. मी मंत्री असतांना मंजूर असलेली अनेक कामे या खोके सरकारने रद्द केली. अन्यथा, आणखी कामे झाली असती, असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी करून माजी आमदार शशिकांत खेडेकर यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. मलगीमध्ये गावकर्‍यांच्यावतीने आमदार डॉ.शिंगणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात येणार्‍या चिखली तालुक्यामधील तीन गावांमधील ५ कोटी ५६ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ. शिंगणे यांच्याहस्ते थाटात पार पडले.

या निमित्त मलगी येथे डॉ. शिंगणे यांची विजयी मिरवणूक वाटावी, अशा पद्धतीने गावकर्‍यांनी त्यांचे स्वागत केले व गावामध्ये जंगी मिरवणूक काढली. मलगी येथे बोलत असताना डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले की, विविध जाती- धर्माची लोकं या छोट्याशा गावामध्ये एकोप्याने गुण्यागोविंदाने राहतात. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली होती, आणि स्वराज्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक एकोप्याने राहायचे. त्याच पद्धतीने ह्या गावामध्ये एकोपा असून, विकास कामासाठी सर्व गावकरी एकत्रित येऊन पाठपुरावा करतात. तसेच, गजानन वायाळ हे अत्यंत चिकाटीने कामाचा पाठपुरावा करतात. कोणते काम कोणत्या योजनेत बसते यांचे पूर्ण ज्ञान त्यांना असल्यामुळे ही कामे झपाट्याने मंजूर झाली, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगून, वायाळ यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले.

यावेळी माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांच्या काळामध्ये झालेल्या कामाचा उल्लेख करत, आमदार डॉ शिंगणे साहेबांना कोणती कामे प्राधान्याने करायची याचा सखोल अभ्यास असल्यामुळे त्यांच्या हातातून लोकांची कामे होतात, असे सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान, सरपंच नारायण चित्राळे, माजी जि. प. सदस्या ज्योतीताई खेडेकर, गजानन वायाळ यांची भाषणे झाली. तर, रोहडा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नारायण चित्राळे, रामनगर येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. शितलताई शितोळे तर मलगी येथील कार्यक्रमच्या अध्यक्षा सरपंच सौ.सुमित्राताई विनायकराव साप्ते या होत्या. तर व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक म्हस्के, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष धोंडगे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. विकास मिसाळ, राम खेडेकर, मदन म्हस्के, रुपराव सावळे, राणा टेलर, भानुदास घुबे, रवी तोडकर, सुभाष डेव्हडे, प्रमोद पाटील, भगवानराव काळे, संजय खेडेकर, अमोल कर्‍हाडे परिसरातील सर्व सरपंच व उपसरपंच ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले. रोहडा येथील सभेचे सूत्रसंचालन संजय खेडेकर, रामनगर येथील अंकुश थुट्टे यांनी तर मलगी येथे श्रीकांत राऊत यांनी तर आभार डॉ. रहीम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!