‘शेती परवडत नाही, मला मरू द्या’; देऊळगावमहीच्या शेतकर्याने सरकारकडे मागितली मरणाची परवानगी!
– देऊळगावमहीचे शेतकरी मधुकर शिंगणे यांच्यावर कोसळले आर्थिक संकट!
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकार यांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेती धोक्यात सापडली. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे भाव मिळत नाही. परिणामी, शेतीपिकात शेळ्या- मेंढ्या सोडून पीक नष्ट करण्याची पाळी शेतकर्यावर आली असून, आर्थिक परिस्थिती ढसाळल्याने एका शेतकर्याने तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला कुटुंबासह इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमही येथील मधुकर उत्तमराव शिंगणे असे या शेतकर्याचे नाव आहे.
मधुकर उत्तमराव शिंगणे शेती व्यवसाय करतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्य शेतीत राबतात. परंतु ते केंद्र आणी राज्य सरकार यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे मेटाकुटीला आल्याचे सांगतात. ते म्हणतात की, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे भाव मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती दरवर्षी खालावत चालली आहे. प्रयोग म्हणून भाजी भाजीपाला शेतीकडे वळलो पण तेथेसुद्धा कटू अनुभव येत आहे. भाजीपाला पिकास शासनाच्या धोरणात हमी भाव नाही. तर तो ग्राहकांच्या मागणीवर अवलंबून असल्याने कवडीमोल भावाने भाजीपाला विकला जात आहे. मधुकर शिंगणे यांच्या शेतात सध्या गोबी पिक आहे मात्र भाव आणि मागणी नसल्याने त्या पिकावरील उत्पादन खर्च आणि मजुरीसुद्धा निघत नसल्याने नाईलाजास्तव एका एकरातील गोबी पिकावर ट्रक्टरने रोटाव्हीटर करुन पिक नष्ट केले. तर २७ फेब्रुवारी रोजी शेळ्या मेंढ्या शेतात सोडून पिक नष्ट केले. काही वर्षापासून असाच प्रकार इतर शेतकर्या सोबत घडत असल्याचे शिंगणे म्हणतात. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार यांच्या शेती धोरणा विरोधात कुटुंबासहित इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी देऊळगावमही येथील मधुकर शिंगणे यांनी एका निवेदनाद्वारे चिखली तहसीलदारांकडे केली आहे.