– मातृतीर्थ सिंदखेडराजातून दुसर्या टप्प्यातील जनजागर यात्रेचा शुभारंभ
सिंदखेडराजा/ बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकारने तोडा, फोडा व राज्य करा ही नीती अवलंबविली असून, हे सरकार हुकूमशाहीने वागत आहेत. राज्यातील प्रकल्प मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे गुजरातला खिरापत म्हणून देत आहेत, महागाईने कळस गाठला असून, बेरोजगारी वाढतच चालली आहे. शेतमालालाही भाव नाही, असा आरोप करत याबाबत सरकारला वठणीवर आणण्यासाठी विधानभवनावर भव्य बेलणे मोर्चा काढणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. विद्याताई चव्हाण यांनी दिला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आयोजित दुसर्या टप्प्यातील राज्यव्यापी जनजागर यांत्रेचा शुभारंभ जिल्ह्यातील सिंदखेड़राजा येथून काल, दि.२४ फेब्रुवारीरोजी राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन झाला. यावेळी विद्याताई चव्हाण बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री आ. ड़ॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड़. नाझेर काझी, राज्य समन्वयक सुरेखा ठाकरे, राज्य समन्वयक आशा मिरगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे, रामभाऊ जाधव, गजानन बंगाळे, विनायक राठोड, निर्मला तायड़े, आशा पवार, ज्योती खेड़ेकर, रेणुका बुरकुल, तालुकाध्यक्ष सतिश काळे, सीताराम चौधरी यांच्यासह मान्यवराची उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री ड़ॉ. राजेन्द्र शिंगणे यांनी मतदार संघातील विकासकामांना शासनाने स्थगिती दिली असून, आपण न्यायालयात दाद मागितली आहे. केंद्र व राज्य सरकार खाली खेचण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन माजी सभापती पूनम राठोड यांनी केले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
—————-