BULDHANAVidharbha

रोजगार मेळाव्यात १२ उमेदवारांना मेळाव्यातच ‘ऑफर लेटर’!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा मॉडेल करिअर सेंटर आणि जळगाव जामोद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आज दि. २४ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद येथे रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. यात १२ उमेदवारांना मेळाव्यातच ऑफर लेटर देण्यात आले. सदर मेळाव्यासाठी १ हजार ९५९ उमेदवारांनी नोंदणी केली. यातील ८५६ उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली. सदर मेळाव्यात ६३५ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

आमदार डॉ. संजय कुटे यांनी दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. महाले, श्री. काळे, श्री. भावले, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, स्वीय सहाय्यक वसंत पालवे उपस्थित होते. आमदार डॉ. कुटे यांनी, कौशल्य, मेहनत करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. युवकांनी सुरवातीला कमी पगारापासून सुरुवात करून प्रगती करावी आणि आयुष्यात सन्मानाचे स्थान मिळवावे. कोणतेही काम लहान नसून आपला आत्मसन्मान हा सगळ्यात मोठा आहे. आयुष्यात शून्यातून विश्व निर्माण करता येऊ शकते. कोणतीही लाज न बाळगता काम केल्यास त्यामधून यश प्राप्ती होते. अनुभवातून आलेले कौशल्य उपयोगात आणून त्याचा आपल्या जीवनात फायदा करून घ्यावा, असे आवाहन केले.

श्री. पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती देवून युवकांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडावा असे आवाहन केले. श्रीमती बारस्कर यांनी प्रास्ताविकातून मेळाव्यासाठी १८ उद्योगानी सहभाग नोंदवून एक हजारावर पदे अधिसूचित केली असल्याची माहिती दिली. प्राचार्य श्री. महाले यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी कौशल्य विकास कार्यालय, जळगाव जामोद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!