Breaking newsBULDHANAChikhaliHead linesVidharbha

मावळत्या सूर्याच्या साक्षीने कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे अनंतात विलीन

चिखली, जि. बुलढाणा (गणेश निकम) – उजाड माळरानावर आपल्या भगिरथ प्रयत्नातून शिक्षणाची गंगोत्री आणत, तसेच सहकार क्षेत्राला चालना देणारे प्रख्यात रामायण निरूपणकार कर्मयोगी, शिक्षणमहर्षी सिद्धीविनायक उपाख्य तात्यासाहेब बोंद्रे यांचे वयाच्या ८२ व्यावर्षी वृद्धापकाळाने आज (दि.२४) पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी रत्नप्रभाबाई, दोन मुले जितेंद्र व राहुल बोंद्रे तथा कन्या सौ. सुजाताताई, सुस्नुषा सौ. भारतीताई व अ‍ॅड. वृषालीताई बोंद्रे, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. तात्यासाहेबांच्या निधनाने बोंद्रे परिवारच नाही तर चिखलीकर हळहळले. अनुराधा नगरीत मावळत्या सूर्याबरोबरच विशाल जनसमुदयाच्या साक्षीने साश्रुनयनांनी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी तात्यासाहेबांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला व एक कर्मयोगी मावळत्या सूर्याच्या साक्षीने अनंतात विलीन झाला. यावेळी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक, औद्योगिक, पत्रकारिता यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील काही काळापासून ‘वानप्रस्थाश्रम’ मध्ये राहणार्‍या व आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्मामध्ये रमलेल्या जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा चिखलीतील ‘अनुराधा परिवारा’चे शिल्पकार सिद्धिविनायक उपाख्य तात्यासाहेब बोंद्रे यांनी वयाच्या ८२ व्यावर्षी जगाचा निरोप घेतला. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांचा जन्म १२ सप्टेंबर १९४१ रोजी झाला. आपल्या जीवनामध्ये त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात वटवृक्षप्रमाणे कार्य केले. लाखो रुग्णांची आरोग्य शिबिरे आयोजित करून कित्येकांना औषधोपचाराची व्यवस्था करून देण्याचे काम केले. सर्वसामान्यांना त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये बळ दिले. अनुराधा परिवाराच्या उभारणीमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. चिखली शहरात अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय उभारून शैक्षणिक दालन उभे केले. तात्यासाहेब बोंद्रे अनुराधा महाविद्यालय परिसरात पर्णकुटी येथे राहत होते. गेल्या दोन-तीन वर्षापासून आजारी असतानाच आज, शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान त्यांचे निधन झाले. तात्यासाहेब गेल्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील फार मोठी हानी झाली असून, ती पुन्हा न भरून निघण्यासारखी आहे.
कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या निधनाची वार्ता राज्यासह संपूर्ण जिल्हाभरात पसरल्यानंतर माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या चिखली येथील राजा टॉवर परिसरातील निवासस्थानी विविध क्षेत्रातील नामवंतांनी धाव घेत, राहुलभाऊंसह बोंद्रे कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, सर्वसामान्य नागरिकांनीदेखील अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी तात्यासाहेबांच्या अंत्यविधीप्रसंगी मावळत्या सूर्याच्या साक्षीने विशाल जनसमुदाय अनुराधानगरीत उपस्थित होता. यावेळी राहुल बोंद्रे व कुटुंबीयांनी तात्यासाहेबांना मुखाग्नि दिला.
याप्रसंगी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकूल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार बबनराव चौधरी, माजी जिल्हाधिकारी भा. ई. नगराळे यांचे शोक संवेदना संदेश प्राप्त झाले होते. तर खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, राणा दिलीपसिंह सानंदा, श्याम उमाळकर, शिवसेनेचे (ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, डॉ. विकास बाहेकर, माजी नगराध्यक्ष सुरेशअप्पा खबुतरे यांनी कर्मयोगी तात्यासाहेबांच्या जीवन चरित्रावर आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्यात.
यावेळी पपू. स्वामी हरिचैतन्य स्वामी महाराज, माजी मंत्री भारत बोंद्रे, मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, आमदार राजेश एकडे, आमदार श्वेताताई महाले पाटील, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, माजी आमदार विजयराज शिंदे, विजयराव खडसे, योगेंद्र गोडे, आशीष रहाटे, माजी आमदार तोताराम कायंदे, मनिषाताई पवार, शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर, शैलेश सावजी, नंदुभाऊ बोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रा. उन्मेश जोशी व गणेश धुंदळे यांनी सूत्रसंचलन केले.


चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांचे वडील कर्मयोगी तात्यासाहेब उपाख्य सिद्धिविनायकजी बोंद्रे यांचे दुःखद निधन झाले. कै. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या पर्णकुटी या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली व राहुलभाऊ बोंद्रे यांचे सांत्वन करून धीर दिला. स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो व या दुःखातून सावरण्याची शक्ती बोंद्रे कुटुंबीयांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
– श्वेताताई महाले पाटील, आमदार चिखली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!