Breaking newsBULDHANAChikhaliHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

‘शेतकरी योद्धा’ पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसणार!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीकविमा आणि सोयाबीन – कापूस दरवाढीसाठी आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांच्या लाठ्या खाऊन तुरुंगात गेलेले रविकांत तुपकर व २४ कार्यकर्त्यांची १६ फेब्रुवारी रोजी अकोला कारागृहातून सुटका झाली. तुपकर आणि कार्यकर्ते कारागृहाबाहेर येताच शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन प्रचंड नारेबाजी करत, या शेतकरी योद्ध्यांचे स्वागत केले. अकोल्यानंतर या सर्वांनी थेट संत नगरी शेगावात पोहचून संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. सत्ताधार्‍यांच्या बळावर आंदोलन दडपण्यात आले. मात्र कितीही अतिरेक केला तरी सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी लढा देत राहणार, हजार वेळा तुरुंगात टाकले तरी आंदोलन सुरुच ठेवणार असून, लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे.

बुलढाणा येथे ११ फेब्रुवारी रोजी रविकांत तुपकरांचे आत्मदहन आंदोलन झाले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यानंतर तुपकरांसह २५ जणांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. १२ फेब्रुवारी रोजी या सर्वांना न्यायालयानीन कोठडी सुनावण्यात आली होती त्यामुळे या सर्वांची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली. १५ फेब्रुवारी रोजी त्यांचा जामीन मंजूर झाला तर १६ फेब्रुवारी रोजी कारागृहातून सुटका करण्यात आली. अकोला, बुलढाणा, वाशीम या तिन्ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी अकोला कारागृहासमोर गर्दी केली होती. तुपकर कारागृहाबाहेर येताच फटाक्यांची आतषबाजी करत सर्वांचे स्वागत करण्यात आले. पत्नी अ‍ॅड. शर्वरी व आईंनी औक्षण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या २५ जणांना घेण्यासाठी फुलांनी सजविलेली बस तयार होती, हे सर्व आंदोलन या बसद्वारे थेट संत नगरी शेगावात पोहचले. ‘श्रीं’ चरणी नतमस्तक होत, या सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना रविकांत तुपकर यांनी केली. जवळा बुद्रूक, खामगाव, हिवरखेड, वैरागड, उदयनगर, अमडापूर, पेठ, दिवठाणा, सोमठाणा, शिंदी हराळी त्यानंतर चिखली, सवणा, केळवद, सव फाटा यासह बुलढाणा शहरात ठिकठिकाणी या शेतकरी योद्ध्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. चिखली छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी आपआपल्या वाहनाने या ताफ्यात सहभागी झाले होते.

सत्ताधार्‍यांनी पोलिसांच्या माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांवर अमानुष लाठीमार करण्यात आली. हेतुपुरस्सपणे आणि चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले, आंदोलनात नसणार्‍या काही जणांना मुद्दामहून गुन्ह्यात अडकविण्यात आले, आम्हाला तुरुंगात टाकले मात्र आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. पोलिसांनी सत्ताधार्‍यांच्या बळावर कितीही अतिरेक केला तरी सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठीचे आंदोलन बंद करणार नाही. जोपर्यंत सर्वसामान्य शेतकर्‍याला त्याच्या हक्काचा न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आला निर्धार असून, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले. या आंदोलनामुळे आम्ही जेलमध्ये गेलो. परंतु त्या मोबदल्यात हजारो शेतकर्‍यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा झाली, नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली हे आंदोलनाचे यश आहे, असेही तुपकरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!