BULDHANAHead linesMaharashtraVidharbha

सिंदखेडराजाचे नामकरण ‘मातृतीर्थ जिजाऊनगर’!

बुलढाणा (प्रतिनिधी) – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्रींचे जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या शहराचे नामांतर ‘मातृतीर्थ जिजाऊनगर’ करण्याची मागणी येथील संतोष पाटील बंगाळे यांनी सन २०१७ मध्ये शासनाकडे केली होती. त्यानुषंगाने कार्यवाही करण्यात येऊन नामांतर करण्याबाबतचा शिफारस प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाकडे सादर केला आहे.

माँसाहेब जिजाऊंच्या नावाने महाराष्ट्रभर ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या शहराचे मूळ नाव ‘आलापूर’ असल्याचे जाधवरावांच्या बखरीत नमूद असून, गवळी राजा सिंधुराज यांनी वस्ती केली म्हणून आलापूरचे नाव सिंदखेड पडले असे म्हटले जाते, पण याचा पुरावा आढळून येत नाही तर येथील प्रचीन नीलकंठेश्वर देवालयाच्या शिलालेखावर ‘परगणे सिद्धपूर’ असा उल्लेख आहे. तसेच तात्कालीन सुप्रसिद्ध कवी गोसावीनंदन यांनी एका ओवीमध्ये ‘सिंदखेड स्थळ सिद्धांचे केवळ देखोनी तात्काळ वास केला’ असे म्हटल्यावरून ‘सिद्धपूर’ किंव्हा सिद्धक्षेत्राचा अपभ्रंश ‘सिंदखेड’ झाला असल्याचे सिंदखेडराजा नावाबाबत वेगवेगळे निष्कर्ष आहे. तसेच पंधराव्या शतकामध्ये सिंदखेडची जहागिरी राजे लाखोजी जाधवरावांकडे होती. त्यावेळी सिंदखेडचे नाव सिंदखेडराजा पडले असून, दि.१२ जानेवारी १५९८ मध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्म येथे झाला असल्याने सिंदखेडच्या महत्वात भर पडत मराठ्यांच्या इतिहासात सिंदखेडला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. तर माँसाहेब जिजाऊंच्या जन्माने पुनीत झालेल्या ‘सिंदखेड तुम्ही मरहाटे याची कासी आहात’ महाराष्ट्राच्या भावविश्वात सिंदखेडला विशेष महत्व असल्याची भावना मराठा सुभेदार मल्हारराव होळकरांनी व्यक्त केल्या आहेत. यावरून सिंदखेडराजा नावाला माँसाहेब जिजाऊंच्या जन्मामुळेच ऐतिहासिक पार्वश्वभूमी लाभली असून, माँसाहेब जिजाऊंच्या जन्मामुळेच नवलौकिक मिळाला आहे. म्हणून सिंदखेडराजा या शहराला मातृतीर्थ जिजाऊनगर नाव देण्यात यावे, अशी मागणी येथील समाजिक कार्यकर्ते संतोष पाटील बंगाळे सन २०१७ मध्ये महायुती सरकारकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्री यांनी तात्काळ कार्यवाहीबाबत निर्देश सामान्य प्रशासन विभागास दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने दि.११ फेब्रुवारी २०१९ रोजीचे पत्रान्वये सिंदखेडराजा या शहराचे नामांतर मातृतीर्थ जिजाऊनगर असे करण्याबाबत विषयी प्रस्ताव केंद्र शासनाचे गृह मंत्रालयाच्या दि.११ सप्टेंबर १९५३ अधिसूचना मधील नाव बदलण्यसंदर्भात दिलेल्या दिशा निर्देशास अनुसरून जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी प्रस्ताव सादर करण्यास निर्देश दिले होते.

त्यावर जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी तहसीलदार सिंदखेडराजा यांनी शासनाचे दिशा निर्देशाप्रमाणे विनविलंब नामांतर प्रस्ताव दाखल करण्याबाबत आदेश दिल्यावरून सिंदखेडराजा तहसीलदार यांनी गृह विभागाचे नाव बदलण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था नाहरकत ठराव, रेलवे स्टेशन, डाक विभागाचे नाहरकत तसेच महसूली गाव व नगरपरिषद स्थापना अधिसूचना याबाबत सविस्तर माहिती संकलित करून सिंदखेडराजा शहराला राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ म्हणूनच महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक महत्व असून, नावलौकिक असल्याने दरवर्षी १२ जानेवारी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवास लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, तसेच जिजाऊंच्या जन्माने पुनीत झालेल्या सिंदखेडराजाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. म्हणून सिंदखेडराजाला या शहराला ‘मातृतीर्थ जिजाऊनगर’ असे नामकरण करण्यावे म्हणून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४ पोट कलम (एक),खंड सहा मधील तरतुदीनुसार सिंदखेडराजा या शहराचे नाव बदलून ‘मातृतीर्थ जिजाऊनगर’ असे नामकरण करण्यात यावे, अशी सिफारस प्रधान सचिव सामान्य प्रशासन मंत्रालय मुंबई यांचेकडे दि. ८ फेब्रुवारी २०२३ नुसार प्रस्ताव पाठवून केली आहे. त्यामुळे आता लवकरच सिंदखेडराजा शहराचे नामांतर ‘मातृतीर्थ जिजाऊनगर’ होऊन सिंदखेडराजा माँसाहेब जिजाऊंच्या नावाने राज्यासह देशभर ओळखल्या जाईल, अशी माहिती संतोष पाटील बंगाळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!