Pachhim MaharashtraSOLAPUR

‘सिव्हिल’मधील रोजंदारी कर्मचार्‍यांना परीक्षेची अट शिथील करून विनाअट कायम करावे!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे गेल्या अनेक वर्षापासून वर्ग चारचे कर्मचारी रोजंदारी तत्त्वावर स्वच्छतेचे काम करतात. शासनाने या रोजंदारी कर्मचार्‍यांना कायम करण्यासाठी परीक्षेची अट घातली आहे. त्यातील बहुतांश रोजंदारी कर्मचारी यांचे शिक्षण हे कमी आहे, परंतु त्यांना चांगला अनुभव आहे. तरी रोजंदारी कर्मचार्‍यांना कायम करण्यासाठी परीक्षेची अट शिथील करण्याची मागणी रोजंदारी कर्मचार्‍यांच्या युनियन करून प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील ७५ हजार रिक्त पदे भरण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या ७५ हजार पदांमध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या पदांचा समावेश आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निवड समितीची स्थापना करुन निवड समिती मार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिनस्थ संस्थांमधील वर्ग ४ मधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करावी. असे निर्देश देण्यात आले आहे. परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ. वैश्यंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी रोजंदारी तत्वावर ११४ रोजंदारी कर्मचारी मागील १० वर्षांपासून कार्यरत आहेत.
तसेच या ठिकाणी वर्ग ४ ची एकूण १५० च्यावर मंजूर असलेली पदे मागील १० ते १२ वर्षांपासून रिक्त आहेत. सदर कर्मचार्‍यांनी रिक्त पदांवर सामील करून घेणे कामी २०१८ मध्ये न्यायालयीन खटला पण दाखल केलेला असून, न्यायाधीशानी वारंवार सरकारी वकील व स्थानिक प्रशासन यांना ‘प्रथमदर्शी न्यायाची बाजू कामगारांकडून आहे. त्यामुळे सदर न्यायालयीन प्रकरण न्यायालयाच्या मध्यस्थीने तडजोड करून संपुष्टात आणावे. अन्यथा, तसे झाले नाही तर या कामगारांना पहिल्यापासून संपूर्ण पगार द्यावा लागेल. यामध्ये शासनाचे नुकसान होईल.’ अशा प्रकारच्या सुचना दिलेल्या असून, न्यायालयीन प्रकरण हे शेवटच्या टप्प्यात आले आहे.

या शासन निर्णयाला अनुसरून स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेण्यात आली व आम्हा रोजंदारी कर्मचार्‍यांमधील बहुतांश कर्मचारी हे अशिक्षित तर काही कर्मचारी कमी शिक्षीत असून, ते लेखी परीक्षा देऊ शकत नाही. यामध्ये महिला रोजंदारी कर्मचार्‍यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु त्यांचा कामाचा अनुभव व त्यांची रुग्ण सेवा फार मोठी आहे. म्हणूनच आमच्या कार्यक्षमतेचा अनुभवांचा विचार करून सदर न्यायालयीन प्रकरण न्यायालयाच्या मध्यस्थीने तडजोड करून संपुष्टात आणावा, व आम्हाला या भरती प्रक्रियेत विनाअट सामील करून घेण्यात यावे, अशा प्रकारची विनंती रोजंदारी कर्मचारी संघटना यांच्याकडून स्थानिक प्रशासकीय अधिकारी शैलेश जाधव यांना करण्यात आली. सिव्हिलमधील रोजंदारी कर्मचारी कोव्हीडच्या काळात सहा-सहा महिने वेतन न मिळविता काम केले आहे. अत्यंत तुटपुंज्या वेतनात मागील दहा वर्षांपासून या ठिकाणी रुग्णसेवा देत आहेत. नियमित कर्मचार्‍यांच्या प्रत्येक संप काळात चोवीस तास रुग्णसेवा दिलेली आहे. स्थानिक प्रशासनाने या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून या कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!