Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

आत्मदहनाचा धसका; विमा कंपनीने रातोरात शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केले ९.७८ कोटी

– विमा कंपनीकडून रातोरात ९ कोटी ७८ लाख रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा, पण तुपकर भूमिकेवर ठाम

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पीकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई व सोयाबीन – कापसाच्या दरवाढ याबाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर नाही. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी टोकाची भूमिका घेतली आहे. त्यांनी स्वतः आत्मदहन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘एक तर आत्मदहन करु द्या, अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घाला’, आता मागे हटणार नाही, असे म्हणत शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंवा एआयसी पीकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले आहे. त्यामुळे प्रशासनासह शेतकर्‍यांचा नजरा रविकांत तुपकर यांच्या शनिवारी होणार्‍या आंदोलनाकडे लागल्या आहेत. दरम्यान, तुपकरांच्या इशार्‍यानंतर एआयसी पीकविमा कंपनीने ९ फेब्रुवारीच्या रातोरात स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या पात्र १५,२२१ शेतकर्‍यांच्या खात्यावर ९ कोटी ७८ लाख रूपये जमा करण्यास सुरवात केली आहे. अनेकांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. परंतु नैसर्गिक आपत्ती अंतर्गत असलेल्या सर्वच पात्र अपात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा व्हावी, पोस्ट हार्वेस्टिंगचा विमाही तातडीने मिळावा व अतिवृष्टीची मंजूर असलेली नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा व्हावी. तसेच सोयाबीन – कापूस दरवाढी संदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावे, या मागण्यांबाबत तुपकर ठाम आहेत.

शेतकर्‍यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर सप्टेंबर २०२२ पासून लढा देत आहेत. ६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात एल्गार मोर्चा, २४ नोव्हेंबर रोजी शेतकर्‍यांची फौज घेऊन मुंबईत जलसमाधी आंदोलन त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री यांच्याशी चर्चा, त्यानंतर राज्याचे कृषि सचिव, कृषि आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा, केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरवा त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला मात्र राज्य शासन शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणताच ठोस निर्णय घेत नसल्याने तुपकरांनी आत्मदहन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. सरकार आमचे जगणेच मान्य करायला तयार नसेल तर आम्ही आता मरण पत्करुन शहीद व्हायला तयार आहोत. त्यामुळे आता आम्हाला आत्मदहन करु द्या, अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घालून शहीद करा, अशी टोकाची भूमिका रविकांत तुपकरांनी घेतल्याने शेतकरीही आक्रमक झाले आहे. कारण आजही जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. ज्यांना मिळाली त्यांना अतिशय तुटपुंजी मदत आहे व अतिवृष्टीचे जिल्ह्यासाठी १७४ कोटी रु. मजूर असूनही शेतकर्‍यांच्या खात्यावर अद्याप जमा झालेले नाही. शिवाय हजार शेतकर्‍यांच्या घरात सोयाबीन व कपाशीला दर नसल्यामुळे माल तसाच घरात पडू नये त्यामुळे शेतकर्‍यांच्या भावना सरकार विरोधात तीव्र आहेत. त्यामुळे शेतकरी या आंदोलनात मोठ्या संखेने सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. जर या होणार्‍या आंदोलन भावनेच्या भरात जर अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असणार ? असा प्रश्न पडत आहे.

तुपकर ४ दिवसांपासून भूमिगत आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. तुपकरांच्या घराला पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकार्‍यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पण तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने ते आज कुठून येतील हे सांगता येत नाही व आंदोलनात काय घडेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, मुंबईतील गुप्तवार्ता शाखादेखील तुपकरांच्या मागावर असून, त्यांच्या ठावठिकाणी शोधला जात आहे. एआयसी कंपनी व बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, गुप्त पोलिस देखील तैनात करण्यात आलेले आहेत.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!