Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

उद्या ‘आर या पार’! आत्मदहन आंदोलनावर शेतकरीनेते रविकांत तुपकर ठाम!

– आता ‘आर या पार’ची लढाई, रविकांत तुपकरांनी सरकारला ठणकावले!
– रविकांत तुपकरांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त वाढवला
– ११ तारखेच्या आंदोलनाच्या धास्तीने प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर
– जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या बैठकांवर बैठका
– ११ तारखेच्या आंदोलनावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरीहिताच्या कापूस व सोयाबीन पीकविम्याच्या प्रश्नावर आक्रमक असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर हे गेल्या चार दिवसांपासून ठरावीक कार्यकर्त्यांसह भूमिगत आहेत. तुपकर भूमिगत झाल्याने पोलिस व जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढले असून, जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग, एआयसी कंपनीचे अधिकारी व पोलिस अधिकारी यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला व आपला अहवाल राज्य सरकारला पाठविण्याची तयारी चालवली होती. दुसरीकडे, मुंबईतील एआयसी कंपनीच्या परिसरात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुप्त पोलिस तैनात करण्यात आले असून, डोळ्यात तेल घालून नजर ठेवली जात आहे. पोलिसांनी तुपकरांच्या घरीदेखील बंदोबस्त वाढवला आहे. दुसरीकडे, बुलढाणा आणि मुंबई पोलिसांनी तुपकरांसह त्यांच्या भूमिगत कार्यकर्त्यांची शोधमोहीम सुरु केली आहे. बुलढाणा व मुंबई पोलिस हायअ‍ॅलर्टवर असून, पोलिसांनी रविकांत तुपकर यांना १४९ अन्वये नोटीस बजावली आहे.

राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सोयाबीन कापूस दरवाढ नसल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहेत, तसेच पीकविमाची रक्कम, अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही शेतकर्‍यांना मिळाली नसून, ती तत्काळ द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. तर मागील तीन महिन्यापासून तुपकर हे आंदोलन करत आहेत. मात्र सरकार काही याकडे लक्ष देत नसल्याने उद्या (दि.११) होणार्‍या आंदोलनात तुपकरांकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या आंदोलनाची प्रशासनाने धास्ती घेतली आहे. या आंदोलनावर संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. मात्र तुपकर हे काही मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत भूमिगत झाले असून, मुंबई व बुलढाणा पोलिसांचे टेंशन वाढले असल्याचे सांगितले जात आहे.

तुपकरांनी उद्या (दि.११) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा भारतीय कृषी विमा कंपनी लि. (एआयसी) पीकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून, पोलिस यंत्रणेची पळापळ सुरू झाली आहे. या दोन्ही ठिकाणी पोलिस तसेच गुप्तचरांचा बंदोबस्त वाढविलेला आहे. तुपकरांचे आंदोलन हाताळण्याचा अनुभव असलेल्या पोलिस अधिकार्‍यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच, आंदोलन करू नये, यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीससुद्धा बजावली आहे. मात्र आपण आता माघार घेणार नसल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले आहे.


तुपकरांशी चर्चा करण्यास सरकारची उदासीनता?

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे वारंवार आंदोलन करून सरकारची प्रतिमा शेतकरीवर्गात मलिन करत आहेत. तसेच, ते ‘सुबोध सावजी’स्टाईल आंदोलनातून सनसनाटी निर्माण करून लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची ही सर्व पाऊले शेतकरीहितापेक्षा आगामी राजकीय वाटचाल डोक्यात ठेवून उचलली जात असल्याची टीका खासगीमध्ये बाेलताना बुलढाणा जिल्ह्यात काही राजकीय नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे हे आत्मदहन आंदोलनदेखील सनसनाटी निर्माण करण्याचा भाग असून, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार सुरू असल्याचीबाबही जिल्ह्यातील काही नेत्यांनी राज्याचे गृहमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली असल्याची बाब गोपनीय सूत्राकडून कळली आहे. त्यामुळे वारंवार रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याची भूमिका घेणारे राज्य सरकार यावेळेस मात्र त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!