AalandiPachhim Maharashtra

आळंदी ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येतील आळंदी ग्रामीण रुग्णालयात जागरूक पालक – सुदृढ बालक या राज्य शासनाच्या आरोग्यदायी उपक्रमाचे माध्यमातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिराचे उदघाटन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, डॉ. शुभांगी नलावडे, कविता भालचिम, पोलीस नाईक मछिंद्र शेंडे, डॉ. श्रीकृष्ण कोलाड, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, प्रशांत कुऱ्हाडे, निघोजे ग्रामपंचायत सरपंच आशिष येळवंडे, स्वामी येळवंडे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, रुग्ण कल्याण समिती सदस्य सतीश चोरडिया, पांडुरंग गावडे, आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर,स्टाफ , रुग्णांचे नातेवाईक, नागरिक उपस्थित होते.

आळंदी पंचक्रोशीतील नागरिक, रुग्ण, शालेय मुले यांनी या महाआरोग्य शिबिराच्या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. अभियानात आळंदीसह परिसरातील विविध शाळा, आश्रम शाळा मध्ये शिकत असलेल्या मुलांची आरोग्य तपासणी, उपचार केले जाणार आहेत. अठरा वर्षे वयोगटा पर्यंत तपासणी केली जाणार आहे. या उपक्रमाचे लाभ पासून गरजू रुग्ण वंचित राहू नये. शस्त्रक्रिया आणि उपचार आरोग्य सेवेच्या माध्यमातून उपलब्द्ध करून दिल्या जाणार असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये अशा सूचना आमदार मोहिते पाटील यांनी दिल्या.

यावेळी येथील रुग्णालयाचे परिसरातील भाजी मंडई, वाहतूक, रस्त्यावर होणारी पार्किंग ने रुग्णवाहिकेला ये जा करण्यास होणारा अडथळा याचा विचार करून भाजी मंडई शाळा क्रमांक चार च्या वापरात नसलेल्या शाळेच्या मैदानावर सरसकट सर्वांची सोय करावी अशी मागणी माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील यांनी केली. तसेच येथील पी.एम रूम आणि यंत्रणा विकसित होण्यासाठी आवश्यक जागेची मागणी त्यांनी केली. यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे यांनी रुग्णालयाचे कंजकाजाचा आणि महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाची माहिती दिली. तत्पूर्वी शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रतिमा पूजन आणि मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
महाआरोग्य शिबिरा मध्ये रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी आदी तपासणी संदर्भात आरोग्य विभागाचे मार्गदर्शन प्रमाणे कामकाज पुढील काही आठवडे सुरु रहाणार आहे. गरजू रुग्णांनी शिबिरात सहभागी व्हावे असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय यांचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!