– स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत मुद्देमालासह ६८८० रुपयांची अवैध देशी दारू जप्त
मेहकर (अनिल मंजुळकर) – जानेफळ येथील रमाई नगरात दारूची अवैध विक्री व अतिक्रमणविरोधात जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊनसुद्धा रमाई नगरात दारू विक्री होत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखकेच्या पोलीस कारवाईत दिसून आले. दारुची अवैध विक्री बंद करण्यात यावी, या मागणीसाठी ७ फेब्रुवारीला जानेफळ गाव कडकडीत बंद करण्यासाठी महिलांनी निवेदन देऊनसुद्धा काहीच कारवाई न झाल्याने अखेर कडकडीत बंद पाळला गेला. त्यामुळे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती या दिवशी गावात साजरी झाली नाही.
जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना जानेफळ येथील अवैध दारूविक्रीबाबत १ फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले होते. तरीही गावात अवैध दारूविक्री सुरूच होती. रमाई नगरात सुरू असलेल्या या अवैध दारू विक्रीबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली होती. दारू विक्री प्रकरणात रमाई नगरात हत्याकांड घडले असूनसुद्धा दारू विक्री होत असल्याने ठाणेदार कोणतीच कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना डोळे झाक कशासाठी? असा प्रश्न जानेफळकर विचारत आहेत. जानेफळात माता रमाई जयंती साजरी झालीच नसल्याने रोष व्यक्त होताना दिसत आहे.
दारूबंदी विभाग साखर झोपेत!
जानेफळसह परिसरात अनेक गावागावात दारू विक्रीमुळे अनेक संसार उद्धवस्त होत आहे. जानेफळ, उटी, वरवंड, पाथर्डी, देऊळगाव साकरशा, मांडवा, पारखेड, कळंबेशवर, नायगाव दत्तापुर, शेंदला, मोळामोळी अश्या अनेक गावांमध्ये दारू विक्री जोमात सुरू आहेत. फक्त अर्थपूर्ण व्यवहारमुळे कुठेच कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक गावातील महिलांनी निवेदन देऊनसुद्धा अवैध दारू विक्री बाबत प्रशासन ठोस उपाययोजना करतांना दिसत नाही.