Breaking newsHead linesMaharashtraWorld update

रेपो दरांत वाढ; कर्जे महागणार, कर्जांचे हप्ते वाढणार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – बेरोजगारी आणि महागाईचा सामना करणार्‍या सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. समितीच्या ६ पैकी ४ सदस्यांनी रेपो रेट वाढवण्याच्या निर्णयाच्या बाजुने मतदान केले. या नव्या वाढीसह आता रेपो रेट ६.५० टक्के इतका झाला आहे. मे २०२२ पासून आतापर्यंत एकूण सहावेळा रेपो रेटमध्ये वाढ झाली. आता गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार आहेत. याची थेट झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत अडीच टक्क्यांनी रेपो रेट वाढला आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी आज रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्यासंदर्भातील माहिती दिली. जागतिक पातळीवरील आर्थिक स्थिती ही काही महिन्यांपूर्वी होती तशी निराशाजनक नाही. मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. महागाईचा दर कमी होत असला तरी अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचा विचार करता महागाईचा दर हा चिंतेचा विषय आहे, असे शशिकांत दास म्हणाले. मागील तीन वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे जागतिक स्तरावरील पतधोरणावर परिणाम झाला आहे. विकासनशील अर्थव्यवस्थांना व्यापारामध्ये या काळात मोठा फटका बसल्याने आर्थिक व्यवहार आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यास प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून आले, असे दास यांनी सांगितले. गृहकर्जावरील व्याज मागील ९ महिन्यांमध्ये २.५० टक्क्यांनी वाढले आहे. वाहनकर्ज आणि इतर कर्जांवरील हफ्त्यांमध्ये वाढ होणार असल्याने कर्जदारांना आपला खिसा अधिक खाली करावा लागणार आहे.


रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने होमलोनच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. मे २०२२ मध्ये जेव्हा ४ टक्के रेपो रेट होता त्यात आता वाढ होऊन ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँकेकडून (एसबीआय) २० वर्षासाठी २५ लाखाचे गृहकर्ज घेतले असल्यास तुम्ही आधी ८.६० टक्के व्याजदराने २१ हजार ८५४ रुपयाचा ईएमआय भरत होता. पण आता व्याजदर २५ बेस पॉईंटने वाढल्याने बँकेचा व्याजदर ८.८५ टक्क्यांपर्यंत वाढेल, ज्यानुसार तुम्हाला २२ हजार २५३ रुपये EMI भरावा लागेल. म्हणजेच तुमचा ईएमआय सुमारे ४० रुपयांनी महाग होईल.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!